संतोष मिठारीकोल्हापूर : अभ्यासू, शिस्तीचे आणि प्रेमळ शिक्षक आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर लाभत गेले. त्यांनी मला घडविण्याचे काम केले. आव्हाने आली की, त्यांना धाडसाने सामोरे जाण्याची वृत्ती माझ्यात या सर्व शिक्षकांच्या संस्कारांमुळे विकसित झाली. त्यांच्यामुळेच आपल्या शिष्यांना सर्वोत्कृष्ट ज्ञान देऊन या देशाचे उत्तम नागरिक म्हणून घडविण्याची जबाबदारी अध्यापक म्हणून आपल्यावर आहे, ही जाणीव सदैव माझ्या मनी जागृत असते.
विविध आव्हानांतून आपल्याला विद्यार्थ्यांच्या रूपाने या देशाचे भवितव्य घडवायचे आहे, याची तीव्र जाणीव सातत्याने होत राहते. ती मला सतत अस्वस्थ ठेवते आणि विद्यार्थ्यांसाठी, या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उत्तम काम करण्याची प्रेरणा देत राहते. ही जाणीव माझ्या सर्व गुरुंची देण असल्याचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.पोलीस खात्यात असल्याने माझ्या वडिलांची दर तीन वर्षांनी बदली व्हायची; त्यामुळे माझे शालेय शिक्षण मराठवाड्याच्या विविध ठिकाणी झाले. औसा, निलंगा, परांडा, लातूर, उपळा, उद्गीर, आदी ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, महाविद्यालयांत मी शिकलो.
या शाळांत मला अनेक शिक्षक शिकवायचे; मात्र त्यातल्या चार-पाच लोकांचा माझ्यावर आजीव प्रभाव पडला आहे. या सर्व शिक्षकांची मला भीती कधी वाटली नाही; मात्र त्यांच्याप्रती आदर आणि धाक आजही मनांत आहे. त्यातील सर्वांत प्रभावशाली शिक्षक म्हणजे माझे गणिताचे आर. एन. खडप हे शिक्षक. ते प्रश्नही न विचारता विद्यार्थ्यांच्या केवळ चेहऱ्यावरून त्याला गणित समजले आहे की नाही, हे ओळखायचे.
प्रत्येक मुलाला जोपर्यंत गणित समजत नाही, तोपर्यंत ते घोटून घोटून शिकवायचे. खडप यांच्या या वैशिष्ट्याचा मला असा लाभ झाला की, मीसुद्धा चेहरा पाहून माणसे ओळखण्याचे कसब साध्य केले. प्रचंड करारी चेहऱ्याचे एस. ए. जाधवर यांच्याकडून आयुष्यात जे काम करावे, ते उत्तमच असावे, असा वस्तुपाठ मी घेतला.
मराठीच्या शिक्षिका शास्त्री यांनी प्रश्न विचारण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. नेहमी शुभ्र धोतर, पांढरा शर्ट, टोपी अशा पोषाखात असणारे शिक्षक गायकवाड यांचा मराठी व्याकरण, शुद्धलेखन अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकविण्यावर त्यांचा भर असे; त्यामुळे शब्दांचे बारकावे समजण्याबरोबरच शब्दांचे सामर्थ्य माझ्या ध्यानात आले.
शिक्षक जोशी हे विज्ञान शिकविताना अचानक काही प्रश्न विचारत. उत्तर देताना आमचा काही गोंधळ उडाला, अगर काही चुकलं तर रागावत नसत; मात्र वर्ग संपल्यावर स्टाफरूममध्ये बोलावून घेत आणि आम्ही ज्यासंदर्भात चुकलेलो असायचो, त्या विषयाची दोन-चार पुस्तकेच आमच्या हाती ठेवीत असत.
दुसऱ्या दिवशी संबंधित प्रश्नाचे मुद्देसूद उत्तर सांगण्याची जबाबदारी आमच्यावर असे. याचा परिणाम असा झाला, की त्या लहान वयापासूनच मला स्वयंअध्ययनाची सवय लागली. या शिक्षकांमुळे संशोधनाचे संदर्भ चिकित्सक पद्धतीने पाहण्याची दृष्टी लाभल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.आई माझ्यासाठी आद्यगुरूजीवनाचे तत्त्वज्ञान शिकविणारे शिक्षण मला आई नागरबाई आणि वडील बाबूराव यांनी दिले. वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांच्या कामाच्या वेळा आणि धावपळ यातून त्यांना कुटुंबासाठी फार वेळ देता येत नसे. ही कसर माझी आई नागरबाई हिने भरून काढली. समाजजीवनातील एक जबाबदार, सुसंस्कारित व्यक्ती म्हणून माझे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम तिने केले, म्हणून आई माझी आद्यगुरू असल्याचे डॉ. शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
तर, ढोरांमागं जावं लागलं असतंआम्ही पोलीस लाईनमध्ये राहायचो. खडप सर दर महिन्याला माझ्या वडिलांना एक पोस्टकार्ड पाठवायचे. त्यात ‘तुमचा मुलगा चांगला आहे. त्याची अभ्यासात प्रगती चांगली आहे. त्याच्या शिक्षणाचं बंडाळ (नुकसान) होऊ देऊ नका,’ अशी कळकळीची भावना व्यक्त केलेली असायची. माझ्या वडिलांनी खूप वेळानंतर मला ही गोष्ट सांगितली. शालेय, महाविद्यालयीन जीवनात शिक्षकांनी शिक्षणासाठी पाठबळ दिले, संस्कार केले; त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील उच्चपदावर काम करता आले. शिकलो नसतो, तर ढोरांमागे जावे लागले असते, असे डॉॅ. शिंदे यांनी सांगितले.गुरू : साक्षात परब्रह्मआदर्श शिक्षक कसा असावा, याचा तत्त्वज्ञानात्मक वस्तूपाठ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी आपल्या आयुष्यात घालून दिला. शिवाजी विद्यापीठाची स्थापना होताना विद्यापीठाला या महान शिक्षकाचे आशीर्वाद लाभले. याच परंपरेला अनुसरून माझ्या गुरुंनी मला घडविले. त्यांचे कृपाशीर्वाद म्हणूनच मलाही ज्ञानदानाच्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी लाभली असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.