लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रभावी अध्यापन करावे, विषय समजावून सांगावा आणि त्याच्या पुढच्या शिक्षणासाठीचा पाया मजबूत करून घ्यावा, अशी अपेक्षा असते. परंतु, बदलत्या परिस्थितीमध्ये मूळ अध्यापन सोडून अन्य अशैक्षणिक कामांमध्येच शिक्षक पिचत असून, याचा मात्र फारसा विचार होताना दिसत नाही. याबाबत शासन आदेश निघूनही तो गुंडाळून ठेवण्यात आल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते.
मुळात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नसतात. त्यामुळे शिपाई आणि लिपिकांनी करावयाची कामे शिक्षकांनाच करावी लागतात. त्या-त्या शाळेतील ही सर्व कामे शिक्षकच वाटून घेऊन करत असतात. याशिवाय केंद्र शाळा, तालुका पातळीवर जेव्हा-जेव्हा बोलावले जाईल, तेव्हा-तेव्हा तेथे जावे लागते. शिष्यवृत्तीसाठी मुलांना बसविण्यापासून त्यांचे जादा तास घेणे, संबंधित परीक्षा केंद्रावर त्यांना घेऊन जाणे, विविध क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांचा सराव करून घेणे आणि स्पर्धेठिकाणी नेणे-आणणे हे सर्व शिक्षकांनाच करावे लागते. हा जरी त्यांच्या कामाचा भाग मानला तरी त्यांना खाली जी दिली आहेत ती जादा कामेही करावी लागतात.
१८ आॅक्टोबर २००५च्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका शिक्षण मंडळे येथील प्राथमिक शाळांतील शिक्षकांना जनगणना आणि निवडणूक विषय कामाव्यतिरिक्त कोणतीही अशैक्षणिक कामे लावू नयेत, असे निर्देश दिले होते. त्यात १ ऑगस्ट २००८ रोजी सुधारणा करून वरील दोन्ही विषयांची कामेदेखील सुट्टीच्या दिवशी व अशैक्षणिक कालावधीत द्यावीत, असा सुधारित निर्णय काढण्यात आला. मात्र, यामध्ये फारसा फरक पडलेला नाही.
चौकट
ही लावली जातात अशैक्षणिक कामे
१ शाळा बांधकाम, जमा-खर्च व देखभाल.
२ लिपिकाची सर्व कामे.
३ गणवेश तयार करून घेणे व वितरण करणे.
४ शालेय पोषण आहार लक्ष ठेवणे, धान्य उतरून घेणे.
५ बीएलओचे काम.
६ शाळा साफसफाई करून घेणे.
७ स्वच्छतागृह साफ करून घेणे.
८ मुला-मुलींना लोहयुक्त गोळ्या देणे.
९ आॅनलाईन माहिती भरणे.
१० पगारबिले तयार करणे.
११ केंद्र स्तर व तालुका स्तरावर मिटिंगला उपस्थित राहणे.
१२ पाठ्यपुस्तके ताब्यात घेणे, वाहन करून आणणे व वितरण करणे.
१३ स्थानिक पातळीवरील गुन्ह्यातील चौकशीवेळी साक्ष देणे.
१४ शाळा रंगरंगोटी करून घेणे.
१५ बागबगीचा करणे व देखभाल करणे.
कोट
शिक्षकाचे मूळ काम शिकवणे असून, या कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही काम शिक्षकांना असू नये. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने शिक्षकांना शिपाई व लिपिकाचीही कामे करावी लागतात. शिक्षकांना अशैक्षणिक कामे न लावण्याबाबत शासन निर्णय होऊनही तो फक्त कागदावरच आहे. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अन्वये शासनाने शिक्षकांना फक्त शिकवू द्यावे.
प्रसाद पाटील
राज्याध्यक्ष- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना.
चौकट
एकूण शाळा १,९७६
एकूण शिक्षक ७,९२६
व्दिशिक्षकी शाळा ४२८
चौकट
व्दिशिक्षकी शाळांमध्ये खूपच अडचण
जिल्ह्यातील सव्वा चारशेहून अधिक शाळा व्दिशिक्षकी आहेत. याठिकाणी एक शिक्षक या कामांमध्ये अडकला की, अध्यापनाचा सर्व भार एकाच शिक्षकावर पडतो. त्यामुळे ही सर्वात मोठी अडचण होत आहे.
कोट
शासन आदेशानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावली जात नाहीत. नाही म्हणायला कोरोना काळात आपत्कालीन सेवा म्हणून शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार देण्यात आले होते.
आशा उबाळे
प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर