- सदाशिव मोरे
आजरा: प्रतिचचेरापुंजीपेक्षाही जास्त पाऊस पडणारं आजरा तालुक्यातील किटवडेपैकी धनगरवाडा. पावसाळ्यातील चार महिने २०० ते २५० मि.मी.पाऊस, जंगली जनावरांचा प्रचंड त्रास. ९ ते १० ओढे व १ नदीच्या पुरातून जि. प. च्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान. गेल्या चार वर्षांपासून शिक्षणाची गंगा प्रवाहीत करणाऱ्या अवलिया शिक्षकाचे नाव आहे उत्तम कोकीतकर गुरुजी.
आजऱ्यापासून जवळपास २७ ते २८ कि.मी.वर असणारी किटवडेपैकी धनगरवाडा शाळा आहे. शाळेला मिळालेले एकमेव शिक्षकही प्रामाणिक व धनगरवाड्यावरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत आहेत. गेले आठ ते दहा दिवस आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
ऊन, वारा, पाऊस झेलत उत्तम कोकीतकर यांनी शाळेकडे जाण्याचे थांबवलेले नाही. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ उत्तम कोकीतकर शाळेत असतात. विद्यार्थ्यांना शिकवायचे. त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा हा दिनक्रम सुरूच आहे. पूरातून मार्ग काढला की जंगली जनावरे समोर येतात. त्यातूनही मार्ग काढत उत्तम कोकीतकर शाळेत जातातचं.
धनगरवाड्यावरील शाळेच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. सध्या शाळा खोपीमध्ये भरते. गेल्या चार वर्षात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून कशाचाही विचार न करता फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे या उद्देशाने प्रेरीत होऊन ज्ञानदान करणारे उत्तम कोकीतकर गुरुजी यांना त्रिवार सलाम.
आठवीपर्यंतच्या शाळेला एकच शिक्षक-
किटवडेपैकी धनगरवाड्याची एक शिक्षकी शाळा. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी शिकतात. धनगरवाड्यावर १० कुटुंबे आहेत. व शाळेची पटसंख्या १३ आहे.पण एकच व प्रामाणिक शिक्षक असल्यामुळे गुणवत्तेत जगाच्या नकाशावर येत आहे.
पुरातून दररोजचा जीवघेणा प्रवास-
शाळेला जाण्यासाठी छोटे-मोठे नऊ ते दहा ओढे व एक नदी आहे. पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या चार महिन्यात अतिवृष्टीचा पावसामुळे दररोजच ओढे व नदीला पूर असतो. या पुरातूनच विद्यार्थ्यांना शिकवण्याची आस असल्यामुळे उत्तम कोकीतकर यांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे.