कोल्हापूर : आपला मोबाईल नंबर लकी असून, तुम्हाला ज्वेलरी, मोबाईल, लॅपटॉप आणि ब्रिटिश पाउंड असे बक्षीस लागले आहे. तुम्ही बॅँकेच्या खात्यावर पैसे भरा, असे आमिष दाखवून भामट्याने कोल्हापुरातील शिक्षक महिलेला सुमारे साडेपाच लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी अज्ञात भामट्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी, रूपा दत्तात्रय पिसाळ (रा. लक्ष्मीनगर, कोल्हापूर) ह्या शिक्षिका आहेत. त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून तुमचा मोबाईल नंबर लकी असून, तुम्हाला बक्षिसे लागली आहेत. त्याद्वारे ज्वेलरी, किमती मोबाईल, तीस हजार रुपयांचा लॅपटॉप आणि ब्रिटिश पाउंड असे गिफ्ट मिळणार आहे.
हे ऐकून पिसाळ भारावून गेल्या. त्यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तो सांगेल त्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यांवर सुमारे साडेपाच लाख रुपये भरले. पैसे भरल्यानंतर संबंधित व्यक्ती पिसाळ यांचे फोन घेण्यास टाळाटाळ करू लागली. त्यानंतर त्याच्या दोन्ही मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता ते बंद ठेवण्यात आल्याचे कंपनीकडून सांगितले जाते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिसाळ यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.आमिष दाखवून फसवणूकसोशल मीडियाद्वारे मोबाईलवर संशयित सुमारे एक लाख संदेश टाकतात. त्यांपैकी पाच ते दहाजण त्यांच्या बक्षिसांच्या आमिषाला बळी पडतात. हे मोठे रॅकेट असून ते मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये बसून लोकांची फसवणूक करीत असल्याचे समजते. त्यांनी शिक्षक महिलेसह अनेकांना अशा प्रकारे गंडा घातल्याचे पुढे आले आहे.
रूपा पिसाळ यांची अज्ञात व्यक्तीने व्हॉट्स अॅपद्वारे फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर क्राइमची मदत घेऊन संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.संजय मोरे पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे