कोल्हापूर : ‘सेवेत सामावून घेण्यासाठीचे डोनेशन बंद झालेच पाहिजे’, ‘जुन्या शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे’, आदी मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दारात प्रा. टी. एम. नाईक यांनी आपल्या पत्नी, मुलांसमवेत लढा सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली प्रा. नाईक, ए. ए. आढाव, एस. एन. मदने, आदी शिक्षकांनी आज, मंगळवारपासून धरणे आंदोलन सुरू केले.निवेदनात म्हटले आहे की, अपवादात्मक संस्थाचालक वगळता दहा ते बारा वर्षे काम केलेल्या, ज्यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थी जमा केले, अशा शिक्षकांना डोनेशन, त्यांचे नातेवाईक व अन्य कारणांनी वगळून नव्या शिक्षकांना घेत आहेत. याबाबत ‘राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती’चे राज्याध्यक्ष प्रा. नाईक आणि अन्य शिक्षकांना सेवेत समाविष्ट होण्यासाठी लढा द्यावा लागत आहे. त्यांच्यासह राज्यातील सुमारे दोन हजार शिक्षकांवर अशी वेळ आली आहे. निव्वळ पैशांसाठी काही संस्थाचालक हे शिक्षण उपसंचालकांची परवानगी नसताना, संबंधित शिक्षकांची ना-हरकत न घेता नवीन शिक्षकांची नियुक्ती करीत आहेत. याबाबत जुन्या शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आंदोलनात प्रा. नाईक यांच्या पत्नी शारदा, मुलगा तन्मय व मुलगी यशस्वी, आदी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)आंदोलनकर्त्यांचे या कार्यालयाकडे कोणतेही काम प्रलंबित नाही. ते ज्या संस्थेत कार्यरत होते, त्याची चौकशी उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली. संस्था प्रा. नाईक यांना सेवेत हजर करून घेण्यास तयार आहे. मात्र, ते त्या ठिकाणी गेलेले नाहीत. त्यांनी तिथे जाणे आवश्यक आहे. त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमचे कार्यालय सकारात्मक आहे.- संपतराव गायकवाड, सहायक शिक्षण उपसंचालक
‘डोनेशन’विरोधात शिक्षकाचे आंदोलन
By admin | Published: January 06, 2015 11:36 PM