लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिकेने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल होणाऱ्यांवर नियंत्रणासाठी, तसेच अॅँटिजन चाचणी करण्यासाठी ४५५ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. याप्रश्नी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांची भेट घेऊन या निर्णयास तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रशासनाकडून शहर व परिसरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. तरीही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांचा समावेश दररोजच्या संख्येत होत नसल्याने आरोग्य विभाग हतबल झाले आहे. अशा रुग्णांची संख्या मोठी असून, त्यांच्याद्वारे संसर्ग फैलावण्याची शक्यता असल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये ४५५ प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आमदार आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल याची भेट घेऊन शिक्षकांचा पालिकेने घेतलेल्या निर्णयास विरोध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शिक्षकांनीही आपल्या व्यथा मांडत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी ठेंगल यांनी कागदोपत्री नोंंद घेऊन त्याचा अहवाल पालिकेस देण्याचे सांगितले. शिष्टमंडळात मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर, शेखर शहा, सुरेंद्र दास, राजेंद्र घोडके यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.