कोल्हापूर : शाळांचे कंत्राटीकरण, कंपनीकरण चालणार नाही, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा, आम्हाला शिकवू द्या, मुलांना शिकू द्या, हमारी युनियन हमारी ताकत, हम सब एक है, या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय..अशा घोषणा देत शनिवारी शिक्षकांनीशाळांच्या कंत्राटीकरण व खासगीकरणाला विरोध केला. सरकारने आता आमचा ऐकले नाही तर पालक विद्यार्थ्यांसह मोर्चा काढू, प्रसंगी शाळा बेमुदत बंद ठेवू असा इशारा यावेळी देण्यात आला.शासनाचे शिक्षण विरोधी आदेश व धोरणांना विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पावसाची तमा न बाळगता जिल्ह्यातून हजारो शिक्षक या निषेध मोर्चासाठी आले होते.पावसाच्या सरी झेलत, हातात फलक घेऊन व जोरदार घोषणा देत मोर्चा टाऊन हॉलपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला. दसरा चौक, व्हिनस कॉर्नरमार्गे दुपारी दोन वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.याठिकाणी आमदार जयंत आसगावकर यांनी मोर्चा मागील भूमिका स्पष्ट केली. शिष्टमंडळाने करवीरचे नायब तहसीलदार बी. बी. बोडके यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, भैय्यासाहेब माने, कुंडलिक जाधव, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अनिल लवेकर उपस्थित होते.
नको शाळांचे खासगीकरण..मुलांना शिकू द्या; कोल्हापुरात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 30, 2023 6:20 PM