महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली या शिक्षकांनी आंदोलन केले. अनुदान पात्र घोषित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी सोमवारी शासनाकडून प्रसिद्ध झाली. त्यात राज्यातील कोल्हापूर आणि मुंबई वगळता अन्य विभागांमधील कनिष्ठ महाविद्यालयांची पात्र-अपात्र याद्या जाहीर झाल्या. कोल्हापूर विभागाची माहिती अप्राप्त अशी नोंद झाली आहे. येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मंत्रालयामध्ये योग्य स्वरूपात आणि निर्धारित वेळेत प्रस्ताव सादर झाले नसल्याने माहिती अप्राप्त अशी नोंद झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचा कोल्हापूर विभागातील विनाअनुदानित शिक्षकांनी यावेळी निषेध केला. प्रस्ताव तातडीने मंत्रालयात पाठविण्याची कार्यवाही करा, अशी मागणी करत त्यांनी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मारला. त्यावर मुंबई, पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सोनवणे यांनी, तर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जयंत आसगांवकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संबंधित प्रस्ताव, आवश्यक माहिती तातडीने मंत्रालयात सादर करण्यात येईल, असे सोनवणे यांनी सांगितले. त्यानंतर या शिक्षकांनी आंदोलन थांबविले. सुमारे चार तास त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामध्ये कृती समितीचे राज्य सचिव सी. एम. बागणे, बाजीराव बर्गे, रावसाहेब पानारी, पांडुरंग चौधरी, राहुल चौगुले, एम. एम. पाटील, जयसिंग जाधव, आदी सहभागी झाले. दरम्यान, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील दोन कर्मचारी आणि कृती समितीचे तीन पदाधिकारी हे मंत्रालयात प्रस्ताव सादर करण्यासाठी सायंकाळी मुंबईला रवाना झाले.
फोटो (१६०२२०२१-कोल-शिक्षक आंदोलन) : कोल्हापुरात मंगळवारी विभागातील कनिष्ठ महाविद्यालये अनुदानासाठी पात्र ठरविण्यात यावीत या मागणीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली विनाअनुदानित शिक्षकांनी आंदोलन केले.