समीर देशपांडे
कोल्हापूर : ‘मी अकरावी-बारावीला असताना सुरेंद्र नावाचे शिक्षक मला गणित शिकवायचे. हा विषय माझ्या आवडीचा. बºयाच वेळा मी तास चुकवून ग्रंथालयात अभ्यास करीत बसायचो; परंतु सुरेंद्र यांनी मला कधीच याबाबत विचारणा केली नाही. कळत्या वयात त्यांनी मला जे जीवनविषयक मार्गदर्शन केले, ते मी कधीच विसरू शकणार नाही. आपण खूप काम करतो, यश मिळवतो; परंतु तुमचं एकदा काम उत्कृष्ट होणं हे महत्त्वाचं ठरत नाही, तर त्यामध्ये सातत्य ठेवणं महत्त्वपूर्ण ठरतं. कुणावरही अवलंबून राहू नका.
जीवन कधीही थांबत नाही आणि मेहनतीशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, ही शिकवण सुरेंद्र यांनी मला दिली; जी मी कधीच विसरू शकत नाही....’ आपल्या शिक्षकांविषयी कोल्हापूरच्याजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आपल्या भावना व्यक्त करीत होते.माझ्या शिक्षकांनी मला केवळ पुस्तकातील धडे शिकविले नाहीत; तर आयुष्यातील मूल्ये शिकवली; म्हणूनच आत्ताच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून माझ्या याच अपेक्षा आहेत.
मी दिल्लीतील डीपीएस द्वारका या हायस्कूल, ज्युुनिअर कॉलेजमध्ये शिकत असताना मला हिंदी शिकविण्यासाठी ज्या शिक्षिका होत्या, त्यांनी पुस्तकाबाहेरच्या अनेक गोष्टी सांगितल्या. त्या म्हणत, ‘तुम्ही आता तुमच्या शिक्षकांचे अनुकरण करणार. आणखी पाच वर्षांनी मित्राचे अनुकरण करणार. जीवन तसेच राहत नाही. ते बदलत राहते. त्यानुसार तुम्ही बदलता. परिस्थिती कितीही बदलली तरी तुम्ही अधिक सुधारण्यासाठीच काम केले पाहिजे.’
दिल्ली ‘आयआयटी’मध्ये मी बी. टेक. करीत असताना अनुज धवन हे माझे प्राध्यापक होते. मी त्यांना म्हणायचो, ‘आपल्या आयआयटीमध्ये नवीन काही नाही.’ तेव्हा ते म्हणायचे, ‘तू हॉवर्डमध्ये गेलास तरी तुला नवीन काही दिसणार नाही. तुमची दृष्टी कशी आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात काय करता हे महत्त्वाचे ठरते. एखाद्या गोष्टीविषयी वेडं होऊन प्रचंड कष्ट उपसल्याशिवाय तुम्ही वेगळं, भरीव काही करू शकत नाही.’ ही शिकवण धवन सरांनी माझ्या मनावर बिंबविली.
फोकट मॅडमनी काढले वर्गाबाहेरसातवीमध्ये असताना नीना फोकट या माझ्या शिक्षिका होत्या. आम्ही मुलांनी काही आगाऊपणा केला म्हणून त्यांनी आम्हांला शिक्षा म्हणून सर्वांना उभे केले होते. याच वेळी मी कुणाकडे तरी बघून हसलो. त्यामुळे त्यांनी मला वर्गाबाहेर काढले. ‘मी केवळ हसलो, म्हणून तुम्ही मॅडम मला बाहेर का काढले?’अशी विचारणा मी त्यांना केली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘तू हसलास म्हणून तुला बाहेर काढलं नाही; तर तू ज्या परिस्थितीला हसलास, त्यासाठी तुला बाहेर काढले आहे. एखाद्याचा खून केला तर तो गुन्हा ठरतो; पण युद्धाच्या काळामध्ये शत्रूला ठार मारणे हा गुन्हा ठरू शकत नाही,’ असे उदाहरण त्यांनी मला त्यावेळी दिले. अशी पुस्तकाबाहेरची शिकवण या शिक्षकांनी मला दिली.
मला फुटबॉलचे वेड लागलेमी सातवीमध्ये असताना फुटबॉल खूप खेळायचो. आम्हांला नरेश म्हणून खूप छान मार्गदर्शक होते. त्यांच्यामुळे तर फुटबॉलवरचे माझे प्रेम आणखीनच वाढले. मी रोज तीन-चार तास फुटबॉल खेळायचो. त्यामुळे माझ्या आवडत्या गणित विषयातही मला कमी गुण मिळाले. अशातच नरेश आमची शाळा सोडून गेले आणि माझे फुटबॉलचे वेडही कमी झाले.
याच पद्धतीने बी. टेक. शिकताना सुब्रत कर हे प्राध्यापक आम्हांला शिकवत होते. ‘तुमचं अंतिम ध्येय काय आहे ते ठरवा,’ असा त्यांचा नेहमी आग्रह असे. एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी तीन-चार मार्ग असतात. अशा परिस्थितीत तुम्ही किफायतशीर, कमी वेळेत ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग निवडण्याची जबाबदारी तुमची असते, अशी शिकवण त्यांनी यावेळी मला दिली.