कोल्हापूर : शिक्षकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र आल्याची घोषणा करणारे प्राथमिक शिक्षक संघाचे नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांच्यात दोन दिवसांत मानापमान नाट्य सुरू झाले आहे. गोव्यात होणाºया राष्टÑीय अधिवेशनावरून दोन्ही नेत्यांत मतभेद सुरू झाले असून, रविवारी कोल्हापुरात होणाºया महामंडळ सभेला उपस्थित न राहण्याचा निर्णय थोरात यांनी घेतल्याने पाटील यांनी येलूर (ता. वाळवा) येथे सभा घेतल्याने दोन्ही नेत्यांतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.महाराष्टÑातील शिक्षक संघटनांमधील सर्वांत ताकदवान संघटना म्हणून प्राथमिक शिक्षक संघाकडे पाहिले जाते. या संघटनात्मक ताकदीच्या बळावर शिक्षकांच्या प्रश्नांवर सत्ताधाºयांना वाकविण्याचे काम केले. शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बहुतांशी शिक्षकांची मोट बांधून सरकारवर एक दबाव ठेवला होता. त्याचे फळ म्हणून पाटील यांना आमदारकी मिळाली होती; पण संघात नवीन नेतृत्व तयार होत गेले तसे पाटील यांची संघटनेवरील पकड ढिली होत गेली. काळानुरूप गुरुजींच्या वेतनश्रेणीत सुधारणा झाली आणि संघटनेकडे मोठ्या प्रमाणात निधी गोळा होऊ लागला. प्रमुख शहरात संघाच्या मालमत्ता उभ्या राहिल्या आणि यातूनच संघात ठिणगी पडली. शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात या दोन नेत्यांत संघाची फाळणी झाली. मध्यंतरी अनेकवेळा दोन नेत्यांत मनोमिलन झाले; पण ते फारकाळ टिकले नाही.मध्यंतरी दोघांनी एकत्र येऊन पुन्हा संघाची बांधणी करावी, असे प्रयत्न झाले. पुणे येथे झालेल्या बैठकीत पाटील व थोरात यांनी एकसंधपणे काम करण्याचा निर्णय घेतला. मालमत्तेचा विषय सामंजस्याने मिटविण्यावर एकमत झाले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्यावतीने गोव्यात महाअधिवेशन घेण्याचा निर्णयही झाला. त्यानुसार पाटील व थोरात यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन शिक्षकांच्या भल्यासाठी एकत्र आल्याचे जाहीर केले होते.गोवा महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापुरात एकसंधपणे महामंडळ सभा घेतली जाणार होती. शिक्षकांना अद्याप रजा मंजूर नसताना महामंडळ सभा घेऊन अधिवेशनाची तयारी करणे चुकीचे असल्याचे थोरात यांनी सांगितले. याच मुद्द्यावरून दोघांत दुरावा झाला आणि पाटील यांच्या गटाने येलूर येथे सभा घेतल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था पसरली आहे.पवार यांची शिष्टाईही व्यर्थशिक्षक संघाने नेहमीच राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना साथ दिली. त्यामुळे संघाच्या फुटीचा फटका राष्टÑवादीला बसला होता. माजी मंत्री जयंत पाटील यांनी मनोमिलनासाठी अनेक वेळा प्रयत्न केले होते. गेल्या महिन्यात जवाहर साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी आले असताना खुद्द शरद पवार यांनी पाटील व थोरात यांना एकत्र राहण्याचा सल्ला देत शिष्टाई केली होती.पुन्हा पैशांसाठीच भांडण?रजेचे कारण पुढे केले असले तरी खरे कारण पैशांचे आहे. महाअधिवेशन त्यातून जमा होणाºया पैशाचा विनियोग कसा व कोण करायचा? हा खरा मुद्दा आहे. वर्गणीचे पैसे राज्य, जिल्हा व तालुक्यासाठी किती व देशपातळीवरील संघटनेसाठी किती यावरूनच दोन नेत्यांत भांडण झाल्याचे समजते.मगच मी मरणार...येलूर येथील सभेत शिवाजीराव पाटील यांनी आक्रमक भाषण केले. मोठ्या हिमतीने संघाची ताकद वाढविली. काही मंडळी माझ्या मरणाची वाट पाहत आहेत. शिक्षकांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आपण मरणार नाही, असा टोला त्यांनी थोरात यांचे नाव न घेता लगावत आपली दिशा स्पष्ट केली. पाटील यांच्या नेतृत्वाखाली थोरात यांनी काम करावे, ते आले तर ठीक, अन्यथा त्यांना सोडून महाअधिवेशनाचे नियोजन करा, असा आग्रह पदाधिकाºयांचा होता.
शिक्षक संघात मानापमान नाट्यातून फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:29 AM