समीर देशपांडे ।कोल्हापूर : गेल्या पाच दशकांपासून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर गारुड घालणाºया ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीची जन्मकथाही तितकीच रोचक आहे. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्याच्या कादंबरीसाठी स्वत: नाट्यप्रयोग करून, त्यातून या कादंबरीच्या छपाईसाठी निधी उभारला होता. शिक्षक-विद्यार्थी नात्यावर प्रकाश टाकणारी ही आठवण आज (सोमवारी) शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनी उजेडात आली आहे.निधी उभारण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयोगांबाबत शिक्षकांनी सुुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेले निवेदन, उत्तूर येथील आंतरभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अनंतराव आजगांवकर यांनाही पाठविले होते. तेथील कागदपत्रांमध्ये हे निवेदन नुकतेच सापडले आहे. त्यातून या कादंबरीच्या प्रकाशनाचा रोचक इतिहास उजेडात आला आहे.१९६० ते १९६७ या कालावधीत वाचन, चिंतन, मनन आणि कुरूक्षेत्री प्रत्यक्ष भेट, यातून सावंत यांनी या कादंबरीचे लेखन केले. मात्र, प्रकाशनासाठी मोठा खर्च येणार असल्याने ते चिंतेत होते. ही बातमी व्यंकटराव हायस्कूलमधील त्यांच्या शिक्षकांना समजली. आपल्या माजी विद्यार्थ्याची साहित्यकृती प्रकाशित व्हावी, यासाठी शिक्षकांनी कंबर कसली. मात्र, तुटपुंज्या पगारात ते शक्य नव्हते. त्यामुळे निधी उभारण्यासाठी सर्वांनी मिळून एक नाटक सादर करायचे ठरविले.त्यानुसार, बाळ कोल्हटकरलिखित ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे नाटक बसविण्यात आले. त्यातून जमा झालेला निधी सावंत यांना देण्यात आला. त्यानंतर, १९६७च्या गणेश चतुर्थीला ‘मृत्युंजय’चे पूजन आणि प्रकाशन झाले. केवळ तीन महिन्यांत तीन हजार प्रतींची पहिली आवृत्ती संपली आणि आजतागायत ‘मृत्युंजय’वरचे वाचकांचे प्रेम कमी झालेले नाही.>शिक्षकांनीच साकारल्या भूमिकाया नाटकामध्ये मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री बा. मा. कुलकर्णी, आप्पासाहेब निर्मळे, वसंतराव गायकवाड, नारायण डोणकर, शिवाजी पाटील, सिनेतारका अलका इनामदार-कुबल, सरोजिनी सुखटणकर यांनी भूमिका केल्या. दिनकर पोवार यांनी या नाटकाला संगीत दिले होते.१९६० ते १९६७ या कालावधीत वाचन, चिंतन, मनन आणि कुरूक्षेत्री प्रत्यक्ष भेटीतून सावंत यांचे लेखन.
‘मृत्युंजय’च्या छपाईसाठी शिक्षकांनी केले नाट्यप्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 5:57 AM