लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कल्पवृक्ष चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर संचलित डॉ. कु. मालती मोहनलाल दोशी हायस्कूल वळिवडे या शाळेत विज्ञान व गणित विषयासाठी अडीच शिक्षकांची गरज असताना विज्ञान शिक्षकाला अतिरिक्त ठरवल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या प्रश्नाबाबत शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले. शाळेत १५ दिवसांत शिक्षक देण्याची ग्वाही प्रशासनाने दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
विज्ञान शिक्षकाची नियुक्ती करावी, यासाठी संस्थेकडे सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला. तरीही संस्थेने आजअखेर विज्ञान शिक्षक दिला नाही. माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी शाळा समितीचे अध्यक्ष राजगोंडा वळिवडे व चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. उपोषणस्थळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी भेट दिली. यावेळी अमोल चौगले, अविनाश पाटील, रावसाहेब चव्हाण, वैजनाथ गुरव, भैया इंगवले, जहाँगीर नदाफ, शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, पोपट दांगट, प्रसाद सलगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : १६०७२०२१-कोल-वळिवडे
करवीर तालुक्यातील वळिवडे येथील मालती दोशी हायस्कूलमधील शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.