कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष ए. के. पाटील यांनी केले.
प्राथमिक शिक्षक संघाच्या (थोरात गट) करवीर शाखेने जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील म्हणाले, शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक संघाच्या माध्यमातून झाली असून, शिक्षकांच्या बदल्यांबाबत शासन निर्णय बदलण्यास भाग पाडू. शिक्षक संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल एस. व्ही. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक प्रकाश सोहनी यांनी केले.
यावेळी राज्य संपर्कप्रमुख एस. व्ही. पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनीलकुमार पाटील, बँकेचे माजी संचालक सुरेश कांबळे, रघुनाथ खोत, विद्यमान संचालिका लक्ष्मी पाटील, जे. डी. कांबळे व बाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. रावसाहेब पाटील, रवी परिट, जिल्हा परिषद सोसायटीचे संचालक श्रीकांत वरुटे, शंकर पाटील, राजेश वाघमारे, तानाजी मेढे व एकनाथ कुंभार यावेळी उपस्थित होते. पद्मजा मेढे यानी सूत्रसंचालन केले तर संभाजी लोहार यांनी आभार मानले.
‘करवीर’ची उमेदवार लादल्यास वेगळा विचार
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत करवीर तालुक्यात उमेदवारी देताना सगळ्यांना विश्वासात घ्यावे, उमेदवारी लादली तर वेगळा विचार करू, असा इशारा ए. के. पाटील यांनी दिला.
शिक्षक सेनेचा संघाला पाठिंबा
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत शिक्षक सेनेने शिक्षक संघाला (थाेरात गट) पाठिंबा दिला आहे. शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे हे या मेळाव्याला उपस्थित होते.
फोटो ओळी : प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये शिक्षक संघाचा मेळावा झाला. यावेळी रघुनाथ खोत, रवीकुमार पाटील, ए. के. पाटील, एस. व्ही. पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-११०१२०२१-कोल-शिक्षक संघ)