कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाचा उपयोग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधातील अस्त्र म्हणून करण्यात येणार असून या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाविषयीची जागृती करणार आहेत. आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या संकल्पनेतून कोरोना : बालक जागृती अभियान राबवण्यात येणार असून हा राज्यातील पहिला प्रयोग आहे. याबाबत रविवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील सर्व शिक्षक-प्राध्यापकांशी ऑनलाइन संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी दिली.
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जागृती हेच महत्त्वाचे अस्त्र आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाबद्दल जागृती व्हावी, स्वत:ची काळजी कशी घ्यावी याबाबत त्यांना माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार आसगावकर यांनी कोरोना : बालक जागृती अभियान ही संकल्पना गुरुवारी पालकमंत्री पाटील यांच्यासमोर मांडली, सायंकाळी त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अभियानाची सुरुवात करण्याचा निर्णय झाला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
बालवाडी ते बारावी...
विद्यार्थी व पालकांना शिक्षक कोरोनाबाबत मार्गदर्शन, समुपदेशन करतील. या अभियानात बालवाडी ते १२ वी पर्यंतचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व मुख्याध्यापक सहभागी होतील.
रविवारी मार्गदर्शन
अभियानाची माहिती व ती कशी राबवायची याबाबत रविवारी सकाळी अकरा वाजता जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक शिक्षकांना ऑनलाइन संवादातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अभियानात मुलांनाही सहभागी करून घेत त्यांच्या माध्यमातून पालकांमध्येही जागृती करण्यात येणार आहे.
--
जिल्हानिहाय टास्क फोर्स
आरोग्य यंत्रणा व प्रशासनाला अधिकाधिक बालकांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी जिल्हानिहाय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असून त्यात शिक्षक, डॉक्टर, समुपदेशक, स्थाानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. कोल्हापूरनंतर अन्य जिल्ह्यात ते स्थापन केले जातील.
--