बंकेतून निवृत्त झालेले अधिकारी संजय कात्रे यांनी कोल्हापुरात डिव्हायडरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी दीड वर्षांपूर्वी रेडियम लावण्याची मोहीम हाती घेतली. याची दखल सर्वप्रथम ‘लोकमत’ने घेतली. यानंतर अनेकांनी त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि ५४ किलोमीटर रस्त्यांवर ही मोहीम राबवण्यात आली. यानंतर वाहतूक सुरक्षेबाबत प्रबोधन करणारी एकांकिकाही त्यांनी बसवली; पण एकांकिकेचे प्रयोग शक्य नसल्याने त्यांनी माहितीपट काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी निधीची गरज भासू लागली. मात्र कोरोनामुळे कोणाकडे सहकार्य मागायचे, असा प्रश्न होता.
अखेर कात्रे यांनी यातून मार्ग काढला. ते इंग्रजी चांगले शिकवतात. त्यांनी शिकवणी सुरू केली. त्यातील बहुतांशी उत्पन्न ते या कामासाठी देणार आहेत. शिकवणीसाठी जागेची गरज असल्याची माहिती उद्यमनगरमधील कारखानदार मुबारक शेख यांना समजली. त्यांनी याच परिसरात असलेला त्यांचा फ्लॅट कात्रे यांना शिकवणीसाठी दिला. एवढेच नव्हे, तर आपल्या कारखान्यातील १६ कर्मचाऱ्यांना इंग्रजीची शिकवणीही त्यांनी लावली.
यावेळी कात्रे यांच्यासह संवेदना संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, सचिव डॉ. हृषिकेश जाधव, खजिनदार सुहास नाईक, विश्वस्त शिरिष पुजारी, अशोक चौगुले, एच. एस. धोत्रे, संजय साळोखे उपस्थित होते.
चौकट
पालकमंत्र्यांकडून अपेक्षा
संवेदनाच्या या उपक्रमाची दखल घेत सतेज पाटील यांनी सहकार्य करण्याची ग्वाही या पदाधिकाऱ्यांना दिली होती. आता तर ते पालकमंत्री झाले आहेत. त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून या उपक्रमासाठी पाठबळ देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची गरज आहे.
चौकट
सत्यनारायणाच्या पूजेला शेख यांची उपस्थिती
शेख यांच्या फ्लॅटमध्ये शिकवणी सुरू करताना सत्यनारायण पूजा घालण्याची इच्छा कात्रे यांनी व्यक्त केली. मुबारक शेख म्हणाले, तुम्ही माझ्या फ्लॅटमध्ये पूजाच करणार असाल तर माझी त्याला काही हरकत नाही. सोमवारी सकाळी पूजेवेळी येऊन शेख यांनी प्रसादही घेतला. एका सामाजिक उपक्रमाला बळ कसे दिले जाते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
२११२२०२० कोल संवेदना
संवेदनाच्या शिकवणी उपक्रमाच्या प्रारंभावेळी संवेदनाचे अध्यक्ष संजय कात्रे यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, सचिव डॉ. हृषिकेश जाधव, खजिनदार सुहास नाईक, विश्वस्त शिरिष पुजारी, अशोक चौगुले, एच. एस. धोत्रे, संजय साळोखे उपस्थित होते.