कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील कामकाजासाठी वापर झालेल्या विविध घटकांच्या बिलांची तपासणी करून आठवड्याभरात पैसे अदा केले जाणार आहेत. बिले योग्य आहेत का? हे तपासण्यासाठी स्वतंत्र असे लेखाधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी दिलेल्या ट्रक, जीप, अशा सुमारे ३00 हून अधिक वाहनांचे भाड्याचे लाखो रुपये उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी थकविले आहेत. भाड्याचे पैसे देण्यासाठी धुमाळ हे सही करीत नाहीत, असे निवडणूक कार्यालयातून सांगितले, असा आरोप करीत वाहनधारक सुभाष जाधव व उत्तम चव्हाण (नागाव) यांनी गेल्या आठवड्यात पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्यासमोर कैफियत मांडली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी देसाई हे परदेश दौऱ्यावर होते.त्यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, मला या संदर्भात कोणीही भेटून सांगितलेले नव्हते. तसेच वाहनधारकांची बिले कोषागार कार्यालयात जमा झाली आहेत. तसेच बिलांबाबत निवडणूक विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले नाही. निवडणूक विभागात कर्मचारी वर्ग कमी असल्याने उर्वरित बिले तपासण्यासाठी स्वतंत्र लेखाधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. त्यांच्याकडून बिले तपासणी पूर्ण झाल्यावर आठवड्याभरात योग्य बिले संबंधितांना दिली जातील.