उचगाव : बेळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या वायुसेनेच्या हेलिकॉप्टर एम आय-८ मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे हेलिकॉप्टर कोल्हापूरविमानतळ येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बेळगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमध्ये वायसेनेचे नऊ अधिकारी व चालक प्रवास करत होते. कोल्हापूर एअरपोर्टवर हेलिकॉप्टरचे लँडिंग झाल्याने वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मंगळवारी सकाळी ११:५५ च्या दरम्यान हा प्रकार घडला.
या हेलिकॉप्टरच्या टेल रोटर गिअर बॉक्स मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर गंभीर दुर्घटनेपासून वाचले. दरम्यान दोन तासांच्या दुरुस्तीनंतर वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. अलीकडच्या काळात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील कटू अनुभव सबंध देशवासीयांच्या डोळ्यासमोरून जात नसताना ही घडलेली घटना गंभीर आहे.
बेळगावहून मुंबईकडे मंगळवारी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी हे हेलिकॉप्टर लँडिंगसाठी तयार होते. टेकऑफ नंतर हेलिकॉप्टर चालकांच्या लक्षात आले की, टेल रोटर गिअर बॉक्समध्ये तांत्रिक बिघाड झाला.
त्यानंतर त्याने कोल्हापूर एअरपोर्टचे निर्देशक कमल कुमार कटारिया यांच्याशी संपर्क साधला. अचानक घडलेल्या आपत्तीजन्य परिस्थिती मुळे एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमशी संपर्क साधून हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बाबीची माहिती मिळताच कोल्हापूर टीमकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला. तसेच फायर ब्रिगेडची यंत्रणा सज्ज ठेवली. विमानतळावरील सर्व पोलीस यंत्रणा,महाराष्ट्र सुरक्षा बल जवान,रुग्णवाहिका यासह सर्व यंत्रणा गतिमान करण्यात आली.
दरम्यान ११ वाजून ५५ मिनिटांनी वायुसेनेचे हेलिकॉप्टर कोल्हापूर विमानतळ येथे लँडिंग केले आणि यातील नऊ अधिकारी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्यानंतर दुपारी १:५५ वाजता हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बिघाड दुरुस्तीनंतर हेलिकॉप्टरने टेक ऑफ केले. कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणचे संचालक कमल कुमार कटारिया यांनी व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.