यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी 'व्हॅक्सिन स्टोअरेज सिस्टीम' विकसित केली आहे. ते एनर्जी स्टोअरेज तंत्रज्ञानामुळे वीज नसतानाही आठ तासांपेक्षा अधिक काळ तापमान नियंत्रित करून व्हॅक्सिन (लस) सुरक्षित ठेवते. अत्यंत कमी खर्चात बनविलेल्या या स्टोअरेज सिस्टीममुळे ग्रामीण भागात व वाहतुकीच्यावेळी मोठा फायदा होणार आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्व्हेनुसार लसीच्या चुकीच्या साठवणूक पद्धतीमुळे जगभरामध्ये २५ टक्के, तर भारतात ४० टक्के लसींचे नुकसान होते. साठवणूक व हाताळणीच्या निर्देशनानुसार लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात ठेवावी लागते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकल विभागाच्या संकेत बापट, रोहित दायमा, अभिषेक •ागाटे व श्रद्धा महाडिक या विद्यार्थ्यांनी प्रा. अवेसअहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून वीज गेल्यानंतरही व वाहतुकीच्या काळात उपयुक्त ठरेल असे साठवणूक यंत्र बनविले आहे.
विद्यार्थ्यांनी या सिस्टीममध्ये थर्मल एनर्जी स्टोअरेज तंत्र वापरले आहे. थर्मल एनर्जी स्टोअरेजसाठी इनऑर्गेनिक आणि युटेकटीक हे फेजचेंज मटेरिअल वापरले आहे. ज्यामुळे वीज नसतानाही पुढील आठ तास तापमान नियंत्रणात ठेवता येते. तसेच इंटरनेट ऑफ थिंग्जच्या वापरामुळे तापमानाचे निरीक्षण आणि लोकेशन अॅपद्वारे समजते. या संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
कोट - लस साठवणुकीमुळे वितरक व दुकानदार यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते; परंतु नव्या तंत्रज्ञानामुळे हे नुकसान टळू शकते. आयोटीच्या समावेशामुळे घरबसल्या तापमानाचे ज्ञान मिळवणे शक्य झाले आहे. ‘शरद’च्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले हे तंत्र औषध उद्योजकांना सोयीचे ठरणारे आहे.
- शंतनु राजमाने, फार्मासिस्ट
फोटो - ०९०४२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथील शरद इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले 'व्हॅक्सिन स्टोअरेज सिस्टीम' सोबत प्रा. अवेसअहमद हुसेनी व विद्यार्थी.