आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर , दि. 0६ : किशोरीताईंचे गाणे म्हणजे नित्य नुतन अनुभव. एकच राग त्या वेगवेगळ््या प्रकारे गायच्या, रागही त्यांना विविधानुभूती द्यायचे. किशोरीताईंना शेरोशायरीची खूप आवड होती. अनेक वर्षांचा सहवास लाभल्याने मला त्यांना जवळून अनुभवता आले. अशा शब्दात किशोरीतार्इंचे ज्येष्ठ शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर यांनी किशोरीताईंच्या आठवणींना उजाळा दिला.
केशवराव भोसले नाट्यगृहात गुणीदास फौंडेशन व अॅस्टर आधार हॉस्पीटलच्या विद्यमाने शनिवारी किशोरीताईंना स्वरांजली अर्पण करण्यासाठी म्हारो प्र्रणाम या सांगीतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ताईंचे ज्येष्ठ शिष्य रघुनंदन पणशीकर यांचे गायन आणि ज्येष्ठ संगीत समीक्षक प्रा. केशव परांजपे यांच्या निवेदनांमधून किशोरीताई नव्याने रसिकांना अनुभवायला मिळाल्या.
पणशीकर म्हणाले, किशोरीताई प्रयोगशील गुरु होत्या. संगीतातील प्रत्येक क्रिया त्यांना अवगत होती. शब्द आणि सुरांना त्यांनी अभ्यास केला होता. शब्द आले की सुरांना दुय्यमत्व येते हे लक्षात आल़्यानंतर किशोरीताईंनी सुरांची निवड केली. त्यामुळे त्या सुगम संगीत, चित्रपटगीते सारखी लाईट म्युजिक कधीच गायल्या नाहीत.
पणशीकर यांनी कार्यक्रमाची सुरवात किशोरीताईंनी अजरामर केलेल्या म्हारो प्रणाम ह्या मीराबाईंच्या भजनाने केली. त्यानंतर किशोरीताईंच्या अनेक रचना सादर केल्या. त्यांना राजप्रसाद धर्माधिकारी (तबला), अभिषेक शिणकर (संवादिनी), आनंद धर्माधिकारी, रवि पंडित (तानपूरा) ़यांनी साथसंगत केली. स्वाती मुनिश्वर यांनी प्रास्ताविक केले.