बांबवडे : बांबवडे (ता.शाहूवाडी) व परिसरात वाढती रुग्ण संख्या विचारात घेता कडक अंमलबजावणीसाठी तहसीलदार गुरु बिराजदार यांनी भेटी देऊन दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करीत दुकानांना सील ठोकले. ग्रामपंचायत समितीला यापुढे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश यावेळी दिले आहेत. विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर त्यांची रॅपिड अँटिजन तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश यावेळी पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना दिले.
सुपात्रे पैकी हनमंतवाडी येथे चार दिवसांपूर्वी २०० नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी नव्याने ३६ रुग्ण कोरोनाबाधित मिळून आले आहेत. याचा गांभीर्याने विचार करून तहसीलदार गुरु बिराजदार यांनी बांबवडे, डोणोली, खुटाळवाडी सुपात्रे, हनमंतवाडी येथे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बांबवडे येथे अचानक भेट देऊन दुकाने उघडी असणाऱ्यांवर कारवाई करून दुकाने सील करण्यात आली. त्याबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाला यापुढे कडक कारवाई करण्याचे आदेश देऊन कामात हलगर्जीपणा झाल्यास ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना विनाकरण फिरणाऱ्या वाहनांवर विशेषत: दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश देऊन रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याचे आदेश दिले.
यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी अनिल घोलप, तालुका वैद्यकीय अधिकारी एच. आर. निरंकारी व इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.