विश्वास पाटीलकोल्हापूर : भारत राष्ट्र समिती या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीही सक्षम नेतृत्वाचा शोध त्यांच्याकडून सुरू आहे. माजी खासदार संभाजीराजे यांना त्याच हेतूने चर्चेसाठी हैदराबादला बोलवले होते, असे समजते.मुख्यमंत्री राव यांच्या पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला मेळावा येत्या रविवारी (दि. ५ फेब्रुवारी) नांदेड येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी जनमानसांत स्थान असलेल्या नेत्याचा शोध सुरू आहे. देशाच्या राजकारणात भाजपच्या विरोधात व काँग्रेसला पर्यायी आघाडी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी तेलंगणाच्या सीमेवरील कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्राच्या सीमेला लागून सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रदेश तेलंगणाचा आहे. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री राव यांनी गेल्या आठ वर्षांत एक कोरडवाहू राज्य ते आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले राज्य अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी मुख्यत: शेती, सिंचन या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणून तेथील शेतकऱ्याचे जीवनमान बदलून टाकले आहे. त्यांचे सरकार शेतकऱ्यांना सरसकट एकरी दहा हजार रुपये तोट्याच्या शेतीबद्दल अनुदान देते. त्यामध्ये कोणतेही स्लॅब नाहीत.
अठरा ते साठ वर्षांपर्यंतचा शेतकरी मृत झाला तर त्याला पाच लाखांचा विमा संरक्षण मिळते. त्याचा हप्ता तेलंगणा सरकार भरते. अशा अनेक योजनांमुळे त्यांनी तेलंगणामध्येही पक्षीय पकड मजबूत केली आहे. शेती, सहकार, साखर कारखानदारीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर, सत्तेवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच शेतीशी आणि चळवळीशी संबंधित नेतृत्वच त्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून हवे आहे.दोन नवे भिडू...प्रस्थापित पक्षांसोबतच आता भारत राष्ट्र समिती व आप हे दोन नवे भिडू महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात उतरू पाहत आहेत. या दोघांत साम्य हे आहे की त्यांनी आपापल्या राज्यात चांगले काम करून दाखविले आहे व तो पॅटर्न घेऊन ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाऊ पाहत आहेत.संभाजीराजे यांची अडचणराव यांच्याकडून महाराष्ट्रातील जनमानसांत स्थान असलेल्या नेत्यांशी संपर्क सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून संभाजीराजे यांना त्यांनी भेटीसाठी बोलविले होते. संभाजीराजेही हैदराबादला जाऊन आले आहेत. ते आता कोणती भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे. राव यांची भाजपला टोकाचा विरोध ही देशपातळीवरील राजकीय दिशा आहे. संभाजीराजे यांची भूमिका मात्र अजूनही भाजपपासून फार लांब जाण्याची किंवा त्या पक्षाला अंगावर घेण्याची दिसत नाही. ही एक अडचण ते एकत्र येण्यात येऊ शकते.