इचलकरंजी : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यालयात खासदार धैर्यशील माने यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीत एका कार्यकर्त्याने तीव्र भावना व्यक्त केल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाहीर बैठकीत अशा भावना व्यक्त होऊ नयेत, याची खबरदारी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी घेतली होती. त्यातूनही हा प्रकार घडल्याने नेमका हा व्हिडीओ केला कुणी आणि त्याला टॅगलाइन जोडून तो व्हायरल कुणी केला याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून बरेच दिवस रस्सीखेच सुरू होती. त्यातूनही खासदार माने यांनी बाजी मारत उमेदवारी मिळवली. उमेदवारीची घोषणा होताच इचलकरंजीतील भाजप कार्यालयास त्यांनी पहिल्यांदा भेट दिली. कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या भाजप कार्यालयातील बैठकीत महेश जाधव यांनी मंडलिक यांचा जाहीर पंचनामा केला. असा प्रकार इचलकरंजीतही होऊ नये, याची दक्षता हाळवणकर यांनी घेतली होती. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मूळ बैठक झाल्यानंतर एखाद्या प्रमुखाचा महत्त्वपूर्ण मुद्दा अथवा प्रश्न असतील, तर ते स्वतंत्र खोलीत मांडावेत, असे नियोजन केले होते. परंतु एका अतिउत्साही कार्यकर्त्याने सभेमध्ये थोडी धुसफूस केलीच. त्यामुळे त्याला खोलीमध्ये बसविण्यात आले. तेथे आल्यानंतर तुमचे म्हणणे मांडा, असे सांगण्यात आले. बैठकीनंतर माने, हाळवणकर खोलीत आल्यानंतर त्या कार्यकर्त्याने हाळवणकर यांना विधानसभेला निवडून आणण्यासाठी तुम्ही काय करणार, हे पहिले सांगा, असे म्हणत आवाज चढविला. त्यावर हाळवणकर यांनीच या कार्यकर्त्याला रोखले. प्रसंगावधान राखत अन्य कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला नेले. हा प्रकार कोणीतरी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ विरोधकांच्या हाताला लागताच त्याला पहिल्याच बैठकीमध्ये माने यांना घरचा आहेर, अशी टॅगलाइन जोडून तो व्हायरल झाला.शहर अध्यक्षांची टाळाटाळयाबाबत खात्री करण्यासाठी भाजप शहर अध्यक्ष अमृत भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेण्यास टाळाटाळ केली. अन्य पदाधिकाऱ्यांनी तांत्रिक उत्तरे दिली.
हाळवणकरांसाठी काय करणार, ते सांगा; खासदार मानेंच्या बैठकीतील कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 12:17 PM