निंगाप्पा बोकडे : चंदगड :
पावसाने चंदगड तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले असून याचा सर्वाधिक फटका कोवाड, अडकूर, कानडी गावाला बसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच आम्ही उघड्यावर पडलो आहोत त्यामुळे आम्ही जगायचं कसं, असा सवाल कानडी येथील नुकसानग्रस्तांकडून विचारला जात आहे.
गेल्या गुरुवारी व शुक्रवारी पावसाने तालुक्यात थैमान घातले होते. धरणातून पाण्याचा विसर्ग आणि त्यात मुसळधार पाऊस यामुळे कानडी गावाला पुराने वेढा दिला. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे गावातील प्रकाश महादेव कांबळे यांचे संपूर्ण घरच कोसळले. त्यांच्यासह अनिता अशोक कांबळे, सयाजी रामचंद्र देसाई, शशीकांत रावसाहेब देसाई यांच्याही घरांचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे या सर्वांचे संसारच रस्त्यावर आले आहेत.
अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गावातील जवळपास १५ ते २० कुटुंबांचे प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. प्रशासनाकडून नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा केला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही.
चौकट
आमदार राजेश पाटील यांच्याकडून दिलासा देण्याचा प्रयत्न
आमदार राजेश पाटील, तहसीलदार विनोद रणवरे यांनी कानडीला भेट देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.
पाणी गावात प्रचंड वेगाने आल्याने आम्ही सर्वांनी प्रथम आपले जीव वाचविण्यास प्राधान्य दिले. पत्त्याच्या घराप्रमाणे डोळ्यांदेखत घर कोसळल्याने खूप त्रास झाला. जीव वाचविण्याचा नादात फक्त अंगावरचे कपडेच शिल्लक राहिले आहेत.
प्रकाश कांबळे, कानडी, पूरग्रस्त.
फोटो ओळी : कानडी (ता. चंदगड) येथील प्रकाश कांबळे यांचे राहत घर पुराच्या पाण्यामुळे असे जमीनदोस्त झाले आहे.
क्रमांक : २५०७२०२१-गड-०५