कोल्हापूर : समज-गैरसमज, समन्वयाचा अभाव, वैयक्तिक अहंकार अशा हिंदोळ्यावर लटकलेल्या महानगरपालिका आयुक्त, नगरसेवक यांच्यातील संघर्षावर आता दिवाळीनंतरच पडदा पडला जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून इरेला पेटलेल्या या संघर्षामुळे प्रशासनावर कमालीचा तणाव असल्याचे दिसून आले. दरम्यान, मंगळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी, कामे होत नाहीत, असा जो आक्षेप आमच्यावर घेतला जातो, त्यासंबंधी कोणती कामे अडवलीत ते तरी सांगा, असा सवाल पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. ‘आयुक्त विरुद्ध नगरसेवक’ असा सामना गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत रंगला आहे. त्यातून नगरसेवकांनी अधिकारी वर्गावर आरोप करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यातच आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रकृतीचे कारण देत सोमवारी (दि. २४) झालेल्या महासभेदिवशी रजा घेतल्याने नगरसेवक अधिकच संतप्त झाले. या सभेत पुन्हा उपायुक्त विजय खोराटे यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आता बराच तणाव दिसत आहे. पत्रकारांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली आणि सोमवारच्या महासभेवेळी रजा घेण्याचे कारण विचारले, तेव्हा आपली प्रकृती बरी नसल्याने मी रजा घेतली होती. तशी पूर्वकल्पना आपण नगरविकास विभागाच्या सचिवांना दिली होती. जाणीवपूर्वक गैरहजर राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा त्यांनी केला. कामे होत नसल्याच्या आक्षेपाबाबत छेडले असता आयुक्त म्हणाले की, अधिकाऱ्यांकडून कामे होत नाहीत तर त्याचा जाब जरूर विचारला गेला पाहिजे. कोणी जाणीवपूर्वक कामे करीत नसतील तर त्याचा जाब नगरसेवकही विचारू शकतात किंवा माझ्याकडे तक्रार करू शकतात. जर कामे होत नाहीत असे वाटत असेल तर कोणती कामे अडवलीत ते तरी सांगावे. अधिकाऱ्यांकडे कोणतीही कामे थांबविली जात नाहीत. कोणी अडवणूक करीत असेल तर ते निदर्शनास आणावे. (प्रतिनिधी) नगररचना विभागाच्या सर्व फाईल उपायुक्तांकडे का दिल्या जातात, हा नगरसेवकांचा प्रश्न आहे. या विभागाच्या कामास आयुक्त म्हणून मी स्वत: जबाबदार असतो. पूर्वी झालेल्या निर्णयानुसार उपायुक्त कार्यालयात नगररचना विभागाच्या फाईल घ्यायच्या आहेत आणि उपायुक्तांच्या शिफारशींनी त्या माझ्याकडे येतात. सर्व फाईल मी व्यक्तिगतरीत्या तपासू शकत नाही; त्यामुळे प्रशासकीय पातळीवर त्यांची छाननी होते. त्यात काही चूक नाही. राहतो प्रश्न तो विजय खोराटे यांच्याकडेच कार्यभार का? आता कोणाला कोणते काम द्यायचे हा माझा प्रश्न आहे. जर खोराटे काम करीत नसतील, त्यांनी कोणाची अडवणूक केली असेल किंवा ते पैसे घेत असतील तर मला दाखवून द्या, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. - पी. शिवशंकर, आयुक्त. सुलभ शौचालय : महापालिका चालविणार बीओटी तत्त्वावर चालविण्यास दिलेली अकरा सुलभ शौचालये चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. जर त्यांना परवडत नसेल तर आम्ही ठेकेदाराने गुंतविलेली पन्नास टक्के रक्कम द्यायला तयार आहोत. महापालिकाच त्यांची देखभाल, दुरुस्ती करेल. परवडत नाही म्हणून शौचालये बंद ठेवून नागरिकांची गैरसोय होऊ नये अशी भूमिका आहे. लक्ष्मीपुरीतील सुलभ शौचालयसुद्धा महापालिका बांधेल. शौचालयाचे काम बंद ठेवा, असे कोणालाही सांगितलेले नाही, असे आयुक्तांनी सांगितले.
कोणती कामे अडवली ते सांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 12:32 AM