कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी हैदराबादहून आलेल्या भाविकांनी गरुड मंडपात शंखपूजा केली. यावेळी या परस्थ भाविकांसोबत कोल्हापुरातील ५१ दाम्पत्यांनी १०८ शंखपूजेचा धार्मिक विधी केला.हैदराबादहून निघालेले हे भाविक अठरा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापुरात आले. श्रावणनिमित्त त्यांनी गरुड मंडपामध्ये ५१ दाम्पत्यांच्या हस्ते शंखपूजेचे धार्मिक विधी करून अंबाबाई देवीच्या चरणी आरोग्य, कल्याण, समृद्धीची प्रार्थना केली.
या ठिकाणी श्रीगणेश, महादेव व अन्य दैवतांची पूजा करण्यात आली. शंखपूजेसाठी आलेल्या भाविकांनी मंदिराच्या बाह्य भागाची फुलांनी सजावट केली होती. पुष्पसजावटीत मांडण्यात आलेल्या शंखांमुळे ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण असल्याने पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.या पूजेत कोल्हापुरातील अंबाबाई भक्तही सहभागी झाले होते. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, सदस्या संगीता खडे, सहसचिव एस. एस. साळवी, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी उपस्थित होते.