कोल्हापूर : कोरोनामुळे गेली तीन महिने अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी, या काळात २८ लाख ३२ हजार ८५७ इतकी ऑनलाईन देणगी भाविकांनी अर्पण केली आहे. जोतिबा मंदिराला १ लाख २९ हजार १४६ इतकी रक्कम मिळाली; पण सद्यस्थितीत उत्पन्नाच्या तुलनेत देवस्थान समितीचा खर्च अधिक असून सगळी भिस्त केवळ अंबाबाई मंदिरातील उत्पन्नावर आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील ३ हजार ६४ मंदिरे आहे. त्यापैकी सर्वाधिक उत्पन्न अंबाबाई मंदिरातून मिळते. त्याखालोखाल जोतिबा मंदिराचा नंबर लागतो; मात्र येथील उत्पन्न अंबाबाई मंदिरापेक्षा खूपच कमी आहे. त्यात कोरोनामुळे एप्रिल महिन्यापासून सर्वच मंदिरे भाविकांसाठी बंद असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत थांबले आहेत. सध्या मिळत असलेल्या उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक आहे. देवस्थान समितीला जमिनींचा खंड मिळतो पण तो खूपच कमी आहे. जोतिबा मंदिराचे उत्पन्न मुळातच कमी आहे. तो लॉकडाऊनमुळे अधिकच कमी झाला आहे. अशा परिस्थितीत देवस्थान समितीच्या सगळ्या खर्चाची मदार केवळ अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नावर आहे. हीच परिस्थिती कोरोनाच्या पूर्वीदेखील होती; पण अन्य मंदिरांचे उत्पन्न कमी अधिक प्रमाणात सुरू होते, ते आता पूर्णत: थांबले आहे. त्यामुळे आस्थापना म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार, कार्यालयीन कामजासाठीचा खर्च, किरकोळ दुरुस्ती, देखभाल आणि देवताकृत्यांसाठीचा खर्च अशा तीन कारणांवर सध्या सर्वाधिक खर्च होत आहे.
---
अंबाबाई मंदिराला मिळालेली देणगी अशी
महिना जमा : खर्च
एप्रिल : ११ लाख ४५ हजार ४७६ : १६ लाख ७५ हजार १६७
मे : ९ लाख ७९ हजार २५० : ४३ लाख ८६ हजार ०२१
जून : ७ लाख ८ हजार १३१ : १६ लाख ६ हजार २६०
एकूण : २८ लाख ३२ हजार ८५७ : ७६ लाख ६७ हजार ४४८
---
जोतिबा मंदिराला मिळालेली देणगी अशी
महिना : जमा : खर्च
एप्रिल : ३४ हजार ५६३ : २ लाख ९८ हजार ५५४
मे : ५२ हजार ०८६ : १४ लाख ३ हजार १२७
जून : ४२ हजार ४९७ : ७ लाख ९४ हजार ४६०
एकूण : १ लाख २९ हजार १४६ : २४ लाख ९६ हजार १४१
---
महिना : लाईव्ह दर्शन घेतलेले भाविक : वेबसाईटला भेट दिलेले भाविक
एप्रिल : १ लाख ५० हजार : ८९ हजार ५००
मे : १ लाख ६५ हजार : ७८ हजार ३२६
जून : १ लाख ७६ हजार : ७६ हजार ६२४
---