कोल्हापूर : कोरोनामुळे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील एक देवता करवीर निवासिनी श्री अंबाबाई, जोतिबा यासह कोल्हापुरातील सर्व मंदिरे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असल्याने देव आणि भक्ताची भेट दुर्लभ झाली आहे. दुसरीकडे मंदिरांवर अवलंबून असलेल्यांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे देवा आता कोरोनाचा कहर कमी कर, मंदिराचे दार उघड, अशी याचना भाविक, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
गेल्यावर्षी देशात काेरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्चला देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा या प्रमुख मंदिरांसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या व नसलेल्या सर्वच मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात आले. आठ महिन्यांनी दिवाळी पाडव्याला ही मंदिरे भाविकांसाठी ठराविक वेळेची मर्यादा घालून सुरू करण्यात आली. नोव्हेंबर ते एप्रिलचा पहिला आठवडा या पाच महिन्यांतच मंदिरे सुरू होती. कोराेनाच्या भीतीने भाविक संख्यादेखील कमीच होती. पर्यटकांची गर्दी कमी झाली होती. सगळे सुरळीत होत आहे, असे म्हणतानाचा एप्रिलमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आणि १२ एप्रिलपासून पुन्हा मंदिरे बंद करण्यात आली. आता जून महिनादेखील संपत आला आहे. गेली अडीच महिने मंदिरे बंद असल्याने रोज नित्यनेमाने येणाऱ्या भाविकांसह एखाद्या औचित्याच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आल्या पावली परत फिरावे लागत आहे. दुसरीकडे मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना अर्थार्जनाचे साधनच उरलेले नाही. परंपरागत चालत आलेला व्यवसाय होत नाही आणि दुसरा व्यवसाय करता येत नाही, अशी त्यांची अडचण आहे. त्यामुळे कर्ज काढून घर चालवायचे, ज्यांना तेदेखील मिळत नाही त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचीच वेळ आली आहे.
---
गेली पंधरा महिने व्यवसाय ठप्प आहे. दुष्काळात तेरावा महिना यावा, अशी अवस्था झाली आहे. आमचा व्यवसाय पर्यटकांवर चालतो, परगावचे भाविक नाहीत, स्थानिक नागरिकांकडून या साहित्यांची किरकोळ प्रमाणात खरेदी केली जाते. दीड वर्षापूर्वी भरलेले साहित्य तसेच पडून आहे, घर चालवायला पैसे नाहीत म्हणून दर कमी करून मिळेल त्या किमतीत विक्री चालू आहे.
नीलेश निकम (पूजा साहित्य विक्रेता)
--
फुलं नाशवंत वस्तू आहे. विक्री झाली नाही की कुजून जातात, विकत आणलेली फुलं कोंडाळ्यात टाकताना घालमेल होते. मंदिर चालू होते तेव्हा भाविक देवीसाठी हार, वेणी न्यायचे, आता कोणी येत नाही. दिवसभर बसून ३० ते १०० रुपयांपर्यंत व्यवसाय होतो. एवढ्या पैश्यात कुटूंबाची गरज कशी भागवायची?
जरीना सय्यद (फूल, हार व्यावसायिक)
--
मुलीचं लग्न ठरलंय म्हणून अथणीवरून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलोय, देवीला साडीचोळी मंगळसूत्र अर्पण करायचं होतं. पण दर्शनासाठी आत सोडेनात. मोठ्या श्रद्धेने आणलेले साहित्य मंदिराच्या दारात ठेवावं लागलं. दर्शन मिळालं नाही, याचं वाईट वाटतंय.
पूजा हेब्बाळ (अथणी)
--
आम्ही इथे शिवाजी पेठेत राहतो. अंबाबाईची दुपारची आरती मी कधी चुकवली नाही, शुक्रवारच्या पालखीला तर हमखास असते. लॉकडाऊन झाल्यापासून मंदिरात जाता आलेले नाही. महाद्वारातून कसंबसं देवीचं मुखदर्शन होतंं. पण त्यात मनाचं समाधान होत नाही. कोरोना कमी हाेऊन लवकर मंदिरे पून्हा भाविकांसाठी खुली व्हायला हवीत.
मंगल साळोखे (गृहिणी)
--
आम्ही पिढ्यानपिढ्या देवीची सेवा करत आलो आहोत, त्यातून उत्पन्न मिळावे हा हेतू कधीच नव्हता. पण अंबाबाईच्या नित्य व नैमित्तीक धार्मिक विधी पार पाडण्यासाठी सेवेकरी आणि मदतनीस असे १०० जण येथे कार्यरत आहेत, त्यातील अनेकजणांचे कुटूंब यावरच अवलंबून आहेत. देवीच्या कृपेने आजवर आम्ही सांभाळून घेत आलो आहाेत.
- माधव मुनिश्वर (सचिव, करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ)
--
फोटो नं २२०६२०२१-कोल-अंबाबाई मंदिर०१
ओळ : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर लाॅकडाऊनमुळे बंद असल्याने मंगळवारी महाद्वारामधून भाविक देवीचे दर्शन घेत होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
०२
एरवी भक्तांच्या गर्दीने गजबजणारे मंदिर भाविकांविना सुनेसुने होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--