समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वर्षानुवर्षे या गावची गिऱ्हाईक मंडळी एकाच दुकानातून खरेदी करीत होती. त्यातूनच मग विठ्ठलावर भक्ती असणाऱ्या दुकानदाराचे आणि त्यांचे स्नेहबंध जुळले. अशातच गावात एकही मंदिर नाही. आहे ते मंदिर गावाबाहेर आहे. पावसाळ्यात तिकडे जाता येत नाही, अशी खंत या गिऱ्हाईकांनी सहज बोलता-बोलता सांगितली. दुकानदारांनी लगेच निर्णय घेतला आणि सहा महिन्यांत वैयक्तिक सात लाख रुपये खर्च करून या गिऱ्हाईकांसाठी त्यांच्या गावात एक उत्तम असे विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर उभारले. आजरा तालुक्यातील चितळे ग्रामस्थ आणि आजऱ्यातील प्रतिष्ठित दुकानदार मधुकर क्रमित यांच्यातील या आपुलकीच्या संबंधांना या मंदिर उभारणीमुळे भक्तिभावाची झळाळी आली. मधुकर क्रमित यांचे आजऱ्यातील मंडईशेजारी अनेक वर्षे दुकान होते. त्यांच्या वडिलांनी हे किराणा मालाचे दुकान सुरू केले होते. व्यवसायातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संबंध वृद्धिंगत होत गेले आणि चितळे ग्रामस्थांसाठी क्रमित यांचे मंडईशेजारील दुकान हक्काचे ठिकाण बनले. धार्मिक कार्यासाठी आणि इतरांना ही विद्या शिकविण्यासाठी मूळच्या नाशिकच्या असणाऱ्या क्रमित यांच्या पूर्वजांना आजऱ्यात इचलकरंजीच्या घोरपडे सरकारांनी आणले. त्यामुळे क्रमित यांचा ओढा कीर्तन, भजनाकडे अधिक. क्रमित यांनी सत्तरी पार केलेली. दोन्ही मुले चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीला. मुलीही त्यांच्या संसारात सुखी. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षिका पत्नी माधुरी यांच्या निधनानंतर मात्र ते अधिकच हळवे बनले.गेल्यावर्षी दुकानात बसणाऱ्या चितळे ग्रामस्थांनी गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर नसल्याची खंत व्यक्त केली. बांधलेले रवळनाथाचे मंदिर गावापासून दीड फर्लांगावर आहे, पावसाळ्यात ओढ्याला पूर येत असल्याने तिकडे चार-चार महिने जाताही येत नाही, अशीही व्यथा त्यांनी बोलून दाखविली. गावात मंदिर नाही याची रुखरुख क्रमित यांनाही लागून राहिली. त्यांनी थेट निर्णय घेतला आणि मंदिरांच्या बांधकामाला सुरुवात केली. गेल्या आठवड्यात या मंदिराची वास्तुशांती झाली. अंगात दीड ताप असणारे क्रमित या सोहळ्याला उपस्थित नव्हते. मात्र, त्यांच्या मिलिंद आणि मंदार या मुलांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांबरोबरच परिश्रम घेतले.मशिदींनाही मदतकेवळ मंदिरांसाठी निधी न देता आजऱ्यातील सर्व मशिदींनाही देणगी देण्याची भूमिका क्रमित यांनी घेतली. वाडा गल्लीतील मशिदीसाठी २५ हजार रुपयांची देणगी त्यांनी दिली. जनता शिक्षण संस्था आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांनाही त्यांनी देणगी दिली आहे.
ग्राहकांच्या इच्छेपोटी बांधले सात लाखांचे मंदिर
By admin | Published: June 03, 2017 12:55 AM