कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थचा जप, स्वामिचरित्राचे वाचन, अभिषेक, आरती अशा विविध उपक्रमांनी बुधवारी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन साजरा करण्यात आला. दरवर्षी यानिमित्त पालखी मिरवणूक, भजन, कीर्तन व धार्मिक सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात मोजक्याच सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाले; तर साधकांना घरीच स्वामिसेवा करण्याची विनंती करण्यात आली होती.
कोटीतीर्थ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्रात दरवर्षी मोठी गर्दी असते. यंदा सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत स्वामींच्या मूर्तीवर मंत्रोक्त अभिषेक, पूजाअर्चा करण्यात आली. सकाळी आठ वाजता भूपाळी, आरती, साडेदहा वाजता नैवेद्य, आरती होऊन प्रसाद दाखविण्यात आला.
येथे दिवसभर भाविक स्वामिचरित्राचे वाचन करीत असतात. मात्र कोरोनामुळे केंद्र बंद असल्याने घरीच स्वामिसेवा करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे रोज नित्य सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांमार्फत पूजा करण्यात आली.
रुईकर कॉलनीतील स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ, प्रज्ञापुरी (काटकर महाराज प्रणित) च्या वतीनेही सकाळी अभिषेक व धार्मिक विधी करण्यात आले. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रकटकांड वाचन करण्यात आले. त्यानंतर पूजा व आरती करून प्रसादवाटप झाले. यासह संभाजीनगर येथील स्वामी समर्थ मंदिरात व विविध दत्तमंदिरांत हा दिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.
--
फोटो नं १४०४२०२१-कोल-स्वामी समर्थ
ओळ : श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त बुधवारी कोल्हापुरातील कोटीतीर्थ येथील स्वामी समर्थ केंद्रात फुलांची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--