आॅनलाईन लोकमत राजापूर : दि. ३0 : तालुक्यातील रायपाटण येथे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनावर झाड पडून एकजण ठार झाल्याची घटना आठवडाभरात घडलेली असताना बुधवारी सकाळी शहरातील वरचीपेठ येथे मारूती मंदिरालगत असलेल्या वडाच्या झाडाची फांदी टेम्पोवर कोसळल्याने टेम्पोचालक गंभीर जखमी झाला. जखमी चालकाला कोल्हापूर येथे हलविण्यात आले.
राजापूर तालुक्यात बुधवारी मुसळधार पाउस सुरु होता. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अनेकांनी शेतीची कामे न करण्याचे ठरवले. राजापूर शहर परिसरातही बुधवारी दिवसभर पाउस पडत होता. शहरातील वरचीपेठ येथील मारूती मंदिरालगत असलेल्या जुनाट वडाच्या झाडाची फांदी बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोवर झाडाची फांदी पडल्याने टेम्पो चालक गंभीर जखमी झाला.
या घटनेबाबत वरचीपेठ परिसरात माहिती मिळताच तेथील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत टेम्पोत अडकलेल्या चालकाला बाहेर काढून राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. नानासोा शामराव बुककाम (३०, शाहूवाडी, कोल्हापूर) असे जखमी चालकाचे नाव आहे. जखमी चालकावर राजापूर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले.
घटनेबाबतची माहिती मिळताच राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे, नायब तहसीलदार राजेंद्र बिर्जे, तलाठी भालेकर आदींनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. महेश बाकाळकर यांनी कटरच्या सहाय्याने झाड कापून बाजूला केले. झाड हटविण्यासाठी वरचीपेठ येथील ग्रामस्थ व तरूणांनी विशेष मेहनत घेतली. झाडाच्या मोठ्या फांद्या जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आल्या.
रस्त्यातच कोसळलेल्या झाडामुळे शीळ, गोठणे-दोनिवडे, चिखलगाव मार्गावरील एस. टी. फेरी बंद ठेवण्यात आली होती. बुधवारी दुपारपर्यंत झाड हटविण्याचे काम सुरू होते. दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रायपाटण येथे अशाच प्रकारे धावत्या वाहनावर झाड कोसळून एका तरूणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांचा विषय ऐरणीवर आला आहे. एवढे प्रकार घडूनही धोकादायक झाडांबाबत दुर्लक्ष का? असा सवाल करण्यात येत आहे.
बांधकाम विभागाने धोकादायक झाडांचे सर्वेक्षण केले आहे. मात्र, अद्याप एकही झाड तोडलेले नाही. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर धोकादायक झाडे तोडणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.