बिडी व टेम्पो पोलिसांच्या ताब्यात
इचलकरंजी : येथील कोल्हापूर नाक्यावर संभाजी बिडीची वाहतूक करणारा टेम्पो संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अडवला. तसेच त्यातील संभाजी बिडीचे १२ लाख २० हजाराचे ६१ बॉक्स रस्त्यावर विस्कटून टाकले. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टेम्पोसह बिडीचे बॉक्स ताब्यात घेतले.
संभाजी ब्रिगेडने संभाजी या नावाने बिडी विक्रीस राज्यभर तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे या बिडी उत्पादक कंपनीने १० सप्टेंबर रोजी पुणे येथे संभाजी नावाने बिडी विक्री करणार नसल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, इचलकरंजी शहरातील कोल्हापूर नाक्यावर बिडी वाहतूक करणारा टेम्पो आल्याचे समजताच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो अडवला. त्यातून संभाजी बिडीचे बॉक्स विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी टेम्पोतील बॉक्स रस्त्यावर विस्कटले. पोलिसांनी बिडीचे बॉक्स आणि टेम्पो ताब्यात घेतला.