कोल्हापूर : कोरोनाच्या काळात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपासून, नव्याने नेमलेल्या आरोग्य समुदाय अधिकाऱ्यांपर्यंत कोविड सेंटरवर अहोरात्र सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचेच सुमारे दहा कोटी रुपये मानधन थकले आहे. त्यामुळे एकीकडे पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आधीचे काम करणारे मानधनाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात गतवर्षी मार्चमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढत गेले. सप्टेंबर २०२० मध्ये तर सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात आली. तोपर्यंत प्रत्येक तालुक्याला कोविड केअर सेंटर्स उभारणी झाली होती. सीपीआर, आयजीएम, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे अनेक सुविधा निर्माण केल्या गेल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना आल्याने ती सुविधा प्रत्येक तालुक्यात उभी करण्यात आली.
अर्थात, उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावर यातील काहीच शक्य नव्हते. त्यामुळे सुमारे २५० कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती बाराही तालुक्यांत करण्यात आली. यामध्ये नर्स, फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन, मानधन तत्त्वावरील वैद्यकीय अधिकारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यावेळी कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात होती त्यावेळी या सर्वांनी काम केले; परंतु तीन महिन्यांनंतर सर्वांना ब्रेक देण्यात आला. मात्र, या सर्वांचे पाच कोटी रुपयांचे मानधन अजूनही थकलेले आहे.
डिसेंबरच्या अखेरीस आरोग्य समुदाय अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्ह्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रांमध्ये ३८० अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र, त्यांचेही प्रतिमहिना सुमारे ४० हजार रुपये याप्रमाणे तीन महिन्यांचे पाच कोटींचे मानधन रखडले आहे. यातील कोरोना काळातील मानधनाची मागणी महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती प्रतिसाद विभागाकडे करण्यात आली आहे, तर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मानधनासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून निधी येण्याची प्रतीक्षा आहे.
चौकट
मंडपवाल्यांचेही पैसे थकले
कोरोनाच्या काळात राज्याच्या सीमांवर जी पथके कार्यरत होती त्यांच्यासाठी मंडप उभारण्यात आले होते. शासकीय सर्व रुग्णालयांच्या आवारात नागरिकांच्या सोयीसाठी मंडप उभारण्यात आले होते. मात्र, निधीअभावी या सर्वांची देणीही बाकी आहेत. त्यासाठीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी कधी येणार याची प्रतीक्षा आहे.
चौकट
विशेष वैद्यकीय अधिकारीही प्रतीक्षेत
कोरोनाच्या काळात एमबीबीएस विशेष वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेने जाहिरात काढली होती. तीन अधिकारी नेमण्यात येणार होते; परंतु त्याचवेळी खासगी दवाखान्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण उपचार घेत होते. त्यामुळे या जाहिरातीला प्रतिसाद मिळाला नाही. केवळ गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात एका डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली. मात्र, त्यांचेही तीन महिन्यांचे मानधन अजून मिळालेले नाही.