कोल्हापूर : सुरक्षारक्षकांच्या गराड्यात उभे राहून व आलिशान गाड्यांना टेकून उभे राहत फिल्मी स्टाइलने हुक्का ओढला. याशिवाय चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. त्याहून गंभीर बाब म्हणजे त्याचा चारचाकीना क्रमांकाच्या पाट्याही नाहीत. याप्रकरणी विशाल अशोकलाल पहुजा (रा. गांधीनगर) याच्यासह दहाजणांवर गुन्हा नोंद झाला आहे. भररस्त्यात अशा प्रकारे कृत्य करणाऱ्या या युवकाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे बुधवारी दिवसभर या व्हिडीओची आणि त्या तरुणाच्या मग्रुरीची चर्चा सुरू होती.
सुसंस्कृत शहर म्हणून कोल्हापूरची ओळख सर्वत्र आहे. मात्र, ही चांगली ओळख काही जण पुसू पाहत आहेत. त्यातीलच एक प्रकार म्हणजे गाड्यांच्या ताफ्यासह सार्वत्रिक ठिकाणी हुक्का ओढत मग्रुरी व माझ्यावर कोणीच काही कारवाई करू शकत नाही, अशा चित्रफीत चित्रीकरण करून सर्वत्र या युवकाने व्हायरल झाल्यानंतर नागरिकांतून अशा प्रवृत्तीबद्दल संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी वेळीच कडक कारवाई करून वेळीच पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.
व्हायरल झालेल्या चित्रफितीची शहानिशा करून लवकरच गुन्हा दाखल करू - तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक, विशेष पोलीस शाखा