आष्टा : आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील शिंदे मळ्याजवळ कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दोन स्रुषांसह दहाजण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी घडली. अपघातातील जखमींवर इस्लामपूर व कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बागणी जिल्हा परिषद गटातील रयत विकास आघाडीचे उमेदवार सागर खोत यांच्या प्रचारासाठी सर्वजण बागणीकडे जात होते. सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा मोहिनी सागर खोत (वय २५), गीतांजली सुनील खोत (२५) यांच्यासह नीलेश किसन खोत (१८), अरुणा दीपक खोत (१६), रूपाली सुनील खोत (३५), जयकर हिंदुराव खोत (२५), योगीता दीपक खोत (१८, सर्व रा. मरळनाथपूर, ता. वाळवा), तेजस्वी गणेश शेवाळे (२८, इस्लामपूर), तृप्ती तानाजी हारुगडे (२१, येलूर), गाडीचालक सुनील लक्ष्मण कचरे (२७, मरळनाथपूर) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. मोहिनी खोत, गीता खोत, हारुगडे व कचरे यांच्यावर कोल्हापूर येथे, तर इतर जखमींवर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मोहिनी खोत यांच्या मणक्यास जबर मार बसला आहे, तर गीता खोत यांची मान दुखावली आहे. तृप्ती हारुगडे व सुनील कचरे यांच्या डोक्यास मार लागल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बागणी जिल्हा परिषदेसाठी सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत रयत विकास आघाडीच्यावतीने निवडणूक लढवत आहेत. रविवारी सकाळी सागर खोत प्रचारासाठी पुढे आले होते. त्यांच्यापाठोपाठ साडेआठच्या सुमारास खोत यांच्या स्नुषा व कुटुंबातील इतर महिला कारमधून (क्र. एमएच ४५, ए ७५७२) येत होत्या. आष्टामार्गे बागणीस जात असताना इस्लामपूर-आष्टा मार्गावर शिंदे मळ्याजवळ कारचा मागील टायर फुटल्याने दोन ते तीनवेळा पलटी होऊन रस्त्यावरून बाजूला उलटली. अपघातात कारमधील सर्वजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद आष्टा पोलिसांत झाली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक कदम, उपनिरीक्षक जहाँगीर शेख करत आहेत.
सदाभाऊ खोत यांच्या स्नुषांसह दहा जखमी
By admin | Published: February 12, 2017 11:41 PM