उत्तूर : बहिरेवाडी (ता. आजरा) येथे विक्रीसाठी आणलेल्या दोन पिस्तूल व २९ जीवंत काडतुसे असा एकूण दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर याप्रकरणी दोघा जणा विरोधात गुन्हा दाखल केला. सद्दाम रशिद शेख (वय-२७) व शहानवाज अल्लाउद्दीन शेख (१९, दोघेही रा. विरवाडे बुद्रुक ता. मोहोळ जि. सोलापूर) अशी या दोघा तरुणांची नावे आहेत. काल, बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल, बुधवारी रात्री सद्दाम व शहानवाज हे विनापरवाना देशी बनावटीच्या दोन पिस्तूल व २९ जिवंत काडतुसे बेकायदा विक्री करण्यासाठी बहिरेवाडी येथून जात होते. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारगुडे हे आपल्या पथकासह गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना बहिरेवाडी गावच्या हद्दीतील चौथ्याच्या खोपी जवळून चारचाकी गाडीतून (MH-१४ GD ४३०६) सद्दाम व शहानवाज संशयास्पदरीत्या जाताना आढळले.पोलिसांनी त्यांची गाडी अडवून त्यांची तपासणी केला असता दोन देशी बनावटीचे पिस्तूल, २९ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन व रोख १३५० रुपये आढळून आले. पोलिसांनी दोन पिस्तुलासह ९ लाख ६० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस.कोचरगी व निरंजन जाधव हे करीत आहेत.
आजरा तालुक्यातील बहिरेवाडीत दोन देशी पिस्तुलासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 3:23 PM