शिरोली : नागाव (ता. हातकणंगले) येथील संभाजीनगरमधील माजी सरपंच, उद्योजक भीमराव खाडे यांचा बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी ३३ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख चार लाख रुपये असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना शनिवारी रात्री नऊ ते रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली.अधिक माहिती अशी, पुणे-बंगलोर महामार्गाजवळ संभाजीनगर परिसरात उद्योजक आणि माजी सरपंच भीमराव खाडे यांचा बंगला आहे. दिवाळी पाडव्याला खाडे यांच्या परिवारातील सर्वजण बंगल्याला कुलूप लावून कागल तालुक्यातील मत्तीवडे या आपल्या मूळ गावी गेले होते. शनिवारी रात्री आठ वाजता भीमराव खाडे यांचा मुलगा अजित खाडे हा कपडे आणण्यासाठी घरी आला होता. तो कपडे घेऊन रात्री नऊ वाजता पुन्हा मत्तीवडेला गेला. शनिवारी रात्री नऊ ते रविवारी सकाळी अकराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कटावणीने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला. बेडरूममधील दोन तिजोरी कटावणीने उचकटून त्या फोडल्या. त्यातील ३३ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख चार लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम लंपास केली.याबाबत शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिसराची आणि नागावमधील मुख्य रस्त्याची पाहणी केली. यावेळी सरपंच अरुण माळी, विजय पाटील हे उपस्थित होते.मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते दागिनेभीमराव खाडे यांचा शिरोली एमआयडीसीमध्ये कारखाना आहे. कंपनीतील कामगारांचा पगार करण्यासाठी आणि दिवाळी भिशीचे पैसे असे सुमारे चार लाख दहा हजार रुपये घरात ठेवले होते. तसेच मुलीच्या लग्नासाठी केलेले ३३ तोळे सोन्याचे दागिने घरीच होते. हा सर्व मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.श्वान हनुमान मंदिराजवळ घुटमळलेघटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले. त्यांनी चोरीचा मार्ग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण केले. श्वानाने भीमराव खाडे यांच्या घरापासून पूर्वेकडे असलेल्या हनुमान मंदिरापर्यंत मार्ग काढत तेथेच घुटमळले. तसेच घटनास्थळी चोरट्यांनी कटावणी आणि कोयता टाकला होता. कोयता आणि कटावणी पोलिसांनी जप्त केली आहे.रविवारी सकाळी अकरा वाजता बंगल्याचा दरवाजा उघडला असल्याचे खाडे यांचा पुतण्या प्रवीण याने पाहिले. त्याला चोरी झाल्याचे कळाल्यावर त्याने भीमराव खाडे यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
नागावात दहा लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:39 AM