जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे रुग्णांच्या सोयीसाठी आठ नव्या रुग्णवाहिका महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून तर स्थानिक आमदार विकास निधीमधून शिरोळ व कुरुंदवाड नगरपरिषदेला प्रत्येकी एक अशा एकूण दहा रुग्णवाहिका दिल्या आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. याचा फायदा जिल्हा उपरुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, शिरोळ व कुरुंदवाड नगरपालिका, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना होणार आहे.
मंत्री यड्रावकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने यंत्रणा सक्षम केली आहे. तत्काळ उपचारासाठी आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिका उपकरणांसह सज्ज अशा देण्यात आल्या आहेत. याचाच भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे आठ रुग्णवाहिका दिल्या.
भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, कागल, पन्हाळा, राधानगरी, शिरोळ या तालुक्यातील आठ शासकीय रुग्णालयांना व शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपालिकेला स्थानिक आमदार विकास निधीमधून प्रत्येकी एक अशा एकूण दहा रुग्णवाहिका जिल्हा परिवहन विभागाकडे नोंदणी केल्यानंतर तातडीने सुपूर्त केल्या जातील असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.