कोल्हापूर : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी सीपीआरमध्ये बुधवारी अत्याधुनिक दर्जाचे नवे दहा व्हेंटिलेटर दाखल झाले आहेत. जिल्हा नियोजनच्या अंदाजे १ कोटी १५ लाखांच्या निधीतून त्यांची खरेदी करण्यात आली आहे. या व्हेंटिलेटरमुळे गंभीर स्थितीत पोहोचलेल्या अधिकाधिक सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करता येणार आहेत.
सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याने सीपीआरमध्ये दाखल रुग्णांची संख्याही वाढली आहे. येथे मुख्यत्वे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील रुग्ण येतात. त्यातही अनेक रुग्ण गंभीर स्थितीपर्यंत पोहोचलेले असतात. मात्र व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने उपचारांवर मर्यादा येतात. ही गरज ओळखून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा नियोजनच्या निधीतून सीपीआरसाठी दहा व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी मान्यता दिली होती. बुधवारी बेलाविस्टा या कंपनीचे अत्याधुनिक दर्जाचे व्हेंटिलेटर सीपीआरमध्ये दाखल झाले आहेत. एका व्हेंटिलेटरची किंमत अंदाजे साडेअकरा लाख रुपये आहे. या नव्या व्हेंटिलेटरमुळे सीपीआरमधील व्हेंटिलेटरची संख्या ११० च्या वर गेली आहे. शिवाय सर्वसामान्य रुग्णांचीही सोय झाली आहे.
---