कोल्हापूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड यावेळेत प्रथम भाषेचा (मराठी विषय) पेपर होईल.या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील दहावीसाठी ८१८० परीक्षार्थींनी, तर बारावीसाठी ८१६० परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. दि. ४ आॅगस्टपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने दहावीसाठी ३४ तर बारावीसाठी २५ केंद्रे निश्चित केली आहेत. परीक्षेदरम्यान या केंद्रांवर भरारी पथकांचे लक्ष राहणार आहे.कोल्हापूर शहरात बारावीच्या परिक्षेसाठी गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, डी. वाय. पाटील, न्यू कॉलेज तर दहावीसाठी राजारामपुरीतील तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल, दसरा चौकातील साई हायस्कूल व पेटाळा येथील न्यू हायस्कूल ही परीक्षा केंदे्र आहेत.
दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत बारावीचा उर्दु या विषयाचा पेपर घेतला जाणार आहे. दरम्यान, परीक्षा कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार अथवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी संबंधित हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे.