इचलकरंजी : अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला त्रास देवून आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी येथील एकास जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच विविध कलमांद्वारे एकूण ६१ हजार रुपये दंड केला. तोहीम अमीन लाटकर (वय ३०, रा. मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे.घटनेची पार्श्वभूमी अशी, या प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीने ७ सप्टेंबर २०१७ ला राहत्या घरी आत्महत्या केली होती. तिला तोहीम हा वारंवार त्रास देत होता. शाळेला जाण्याच्या मार्गाने तिचा पाठलाग करणे. तिच्याकडे गिफ्ट मागणे, असे प्रकार सुरू होते.
ही माहिती मुलीने नातेवाइकांना दिली. त्यानंतर त्यांनी तोहीमला समज दिली. तरीही तोहीमने १ सप्टेंबर २०१७ ला मुलीच्या घरासमोर गाडी आडवी लावून तिच्याशी हुज्जत घालत ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी भागातील महिलांनी पीडित मुलीची सुटका केली होती. या प्रकारानंतर त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली, अशी तक्रार पीडित मुलीच्या आईने गावभाग पोलिस ठाण्यात दिली.त्यावर सुनावणी होवून पोलिस उपनिरीक्षक एन.एन.सूळ यांनी दाखल केलेले दोषारोपपत्र तसेच सात साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकील एच.आर.सावंत-भोसले यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पीडित मुलीच्या आत्महत्येस तोहीम याला जबाबदार धरून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. तसेच नुकसान भरपाईची रक्कम पीडित मुलीच्या नातेवाइकांना देण्याचे आदेश दिले.प्रतिनिधींबरोबर आरोपीची झटापटया प्रकरणात शिक्षा लागल्यानंतर तोहीम याचे छायाचित्र व चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी हुज्जत घालत त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एकाचा मोबाईल फुटला. हा सर्व प्रकार गावभाग पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच घडला. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी याबाबत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.