कोल्हापूर : अल्पवयीन युवतीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास सह जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी पोक्सो कायद्यांतर्गत दहा वर्षे सक्तमजुरी व ३१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अरविंद महादेव वडर (वय २७, रा. दौलतनगर, राजारामपुरी) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अमिता ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले, तर केसचा तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जे. आर. चव्हाण यांनी केला.
खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, पीडित युवती अल्पवयीन असून ती कॉलेजवरून घरी जाताना आरोपी अरविंद वडर तिचा वारंवार पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने तो पीडितेला वारंवार मारहाण करायचा. पीडितेने त्याच्या दुचाकीवर बसण्यास नकार दिल्यास तिला चाकूचा धाक दाखवून काठीने मारत होता. मार्च २०१८ मध्ये आरोपी वडर याने पीडितेला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवून लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारामुळे तिने कॉलेजला जाणेच बंद केले. तिने घडलेला प्रकार आपल्या मावशीला सांगितला. आरोपी वडर याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानुसार त्याला अटक झाली.
खटल्यात सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले. विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांचा युक्तिवाद व साक्षीदारांच्या साक्षी, तसेच मुंबई उच्च व सर्वोच्च न्यायालयातील निवाडे ग्राह्य मानले. त्यानुसार लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो)सह इतर अधिनियमान्वये आरोपी अरविंद वडर याला १० वर्षे सक्तमजुरी व ३१ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास आणखी ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती अपिलाचा कालावधी संपल्यानंतर पीडितेस देण्याचा आदेश झाला. सरकारी वकिलांना खटल्यात ॲड. भारत शिंदे, ॲड. महेंद्र चव्हाण, पोलीस नाईक माधवी घोडके, अशोक शिंगे यांचे सहकार्य मिळाले.
फोटो नं. १००८२०२१-कोल-अरविंद वडर (आरोपी-कोर्ट)
100821\10kol_3_10082021_5.jpg
फोटो नं. १००८२०२१-कोल-अरविंद वडर (आरोपी-कोर्ट)