कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरुड मोरसी या मतदारसंघातील देवेंद्र भुयार या शेतकरी कार्यकर्त्याने कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करून तब्बल नऊ हजार मताधिक्याने विजय मिळविला. भुयार यांच्या रूपाने ‘स्वाभिमानी’ने २००४ नंतर पुन्हा एकदा विधानसभेत एंट्री केली आहे; पण शिरोळ या बालेकिल्ल्यात मात्र ‘स्वाभिमानी’ला सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सन २००४ मध्ये जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिरोळमधून विधानसभा निवडणूक लढविली. १८ हजार ७४७ मताधिक्याने शेट्टी यांनी काँग्रेसच्या रजनी मगदूम यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केली होती. त्यानंतर मात्र २००९, २०१४ आणि आता २०१९ मध्ये शिरोळची निवडणूक त्यांनी ताकदीने लढविली; पण त्यांना यश आले नाही. २००९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांना काँग्रेसचे सा. रे. पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. २०१४ मध्ये ‘स्वाभिमानी’ने सावकार मादनाईक यांना उमेदवारी दिल्याने उल्हास पाटील यांनी बंडखोरी करीत शिवसेनेकडून निवडणूक लढविली आणि जिंकलीही. सावकार मादनाईक चौथ्या स्थानी राहिले.
सन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील पाच जागा लढविल्या होत्या. शिरोळमधून पुन्हा एकदा ‘स्वाभिमानी’ने सावकर मादनाईक यांनाच रिंगणात उतरविले होते. मिरजेमधून बाळासाहेब वनमोरे, अमरावती जिल्ह्यातील वरुड मोरसीतून देवेंद्र भुयार, नंदूरबारमधून प्रकाश आंकुरडे, अकोला जिल्ह्यातील बालापूरमधून तुकाराम दुधे यांना रिंगणात उतरविले होते; पण यापैकी अमरावती जिल्ह्यातील वरुड मोरसीतून देवेंद्र भुयार यांचा अपवाद वगळता उर्वरित ठिकाणी ‘स्वाभिमानी’च्या पदरी निराशा आली. भुयार यांनी थेट कृषिमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी ‘स्वाभिमानी’ला १० वर्षांच्या खंडानंतर विधानसभेची दारे खुली झाली आहेत.