कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक येथे उभारण्यात येणाऱ्या बहुमजली पार्किंगसाठी निविदा भरण्याची उद्या, शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत आहे. ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) असा हा प्रकल्प महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९७६ कलम ३७ नुसार बेकायशीररीत्या नियमबाह्य परवानगी देऊन उभारण्यात येत आहे. बेकायदेशीर निविदेमुळे भविष्यात ठेकेदार न्यायालयात गेल्यास महापालिकेला आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे नियमात राहूनच निविदा राबविण्याची विनंती प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना आज, गुरुवारी निवेदनाद्वारे केली.सतत वाहनांची वर्दळ व पार्किंगची व्यवस्था नसल्यानेच मध्यवर्ती बसस्थानकाजवळ बहुमजली पार्किंग करण्याचे नियोजन महापालिकेने केले. येथील ३० हजार चौरस फू ट जागेवर चार ते पाच मजली पार्किंग व्यवस्था बीओटी तत्त्वावर सुरू करण्यासाठी महापालिकेने गेल्या दीड वर्षात चारवेळा निविदा काढल्या आहेत. या पार्किंग व्यवस्थेत २१० कार, १०० रिक्षा, २५ दुचाकी गाड्या व पाच टॅक्सींची पार्किंग व्यवस्था होणार आहे. बस स्टँडवर गाडी थांबविण्यास हक्काची जागा उपलब्ध होणार असल्याने परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पार्किंगसाठी राखीव जागेवर पार्किंग व्यवस्थाच झाली पाहिजे. मात्र, नगररचना विभागाच्या कायद्याचा भंग करीत पार्किंगसह याठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. जागेच्या वापरात बदल करण्यासाठी नगररचना विभागाची अतिरिक्त परवानगी आवश्यक आहे. घाईघाईने महापालिकेने निविदा राबविल्यानंतर भविष्यात इतर प्रकल्पांप्रमाणे हाही प्रकल्प न्यायिक वादाचा मुद्दा बनू शकतो, असे देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
निविदाच बेकायदेशीर
By admin | Published: September 18, 2014 12:14 AM