पेठवडगाव : खोची येथे आक्षेपार्ह स्टेटस मोबाईलवर ठेवून दोन समाजात तणाव निर्माण झाला. आज, मंगळवारी रात्री आठ वाजता येथील एसटी स्टँड परिसरात या घटनेचा निषेध युवक व मुस्लीम समाजाच्यावतीने करण्यात आला. दरम्यान, निषेध सभा सुरू असताना, एका गटाने युवकाच्या आजोळच्या घरावर हल्ला करून घरगुती प्रापंचिक साहित्याची नासधूस केली. संशयित युवकाला अटक करावी, या मागणीसाठी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मारला. अखेरीस याबाबतचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी दुपारी आजोळी राहत असलेल्या मुस्लीम युवकाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवला होता. त्या युवकाचे मूळ गाव उदगाव आहे. तर तो वाळवा व खोची येथेही राहण्यास असतो. त्याचा नंबर खोची येथील युवकाकडे आहे. सावर्डे, मिणचे येथे अशाच घटना उघडकीस आल्यानंतर वाद झाला होता.
या पार्श्वभूमीवर खोची येथे आजोबांकडे कधी कधी वास्तव्य करणाऱ्या युवकांच्या स्टेटसची चर्चा गावात चर्चा सुरू होती. दुपारपासून या स्टेटसबाबत युवकांत गटागटाने चर्चा होत होती. रात्री आठ वाजता खोची एस.टी.स्टॅड परिसरात जमून या घटनेचा निषेध केला. काही युवकांनी या युवकाला ताबडतोब अटक करा, अशी मागणी केली; तर जमावातील काहींनी त्या आजोळच्या घरावर चाल करून हल्ला केला. घरातील प्रापंचिक साहित्याची नासधूस केली.दरम्यान, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने खोची ते वडगाव पोलिस ठाणे अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी जोरदार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. युवकाला अटक करून योग्य ती कारवाई करण्याची हमी दिली. दरम्यान, त्यानंतर उपस्थितांची समजूत घालून पाठविण्यात आले.