कोल्हापूर : येथील खासबाग मैदानात सुरू असलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या खासदार ब्रिजभूषण सिंग यांना आमंत्रित केल्याच्या विरोधात महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी जोरदार घोषणाबाजी केली. स्पर्धेच्या आयोजक अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा निषेध नोंदवून खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या नगरीत विजेत्या महिला मल्लांनी बक्षीस स्वीकारू नये, अशी मागणी केली.भारतीय कुस्ती महासंघ आणि अस्थायी समितीतर्फे स्पर्धा आयोजित केल्या आहेत. महिला मल्लांनी खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. अशा खासदाराची पोस्टरबाजी कोल्हापुरात झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया उमटली. स्पर्धा सुरू असतानाच सामाजिक कार्यकर्त्या सीमा पाटील, गीता हासूरकर, स्वाती काळे आदी महिलांनी कुस्ती आखाड्याजवळ येत आयोजक सय्यद आणि खासदार ब्रिजभूषण यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खासबाग मैदानात लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या ब्रिजभूषणला आमंत्रित करणाऱ्या अभिनेत्री सय्यद यांना आम्हाला जाब विचारायचा आहे, त्यांना पाठवा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र अभिनेत्री सय्यद आल्या नाहीत. आयोजक समर्थक मल्ल रवींद्र पाटील हे खासदार ब्रिजभूषण यांची बाजू मांडू लागले. सिंग यांच्यावर अजून गुन्हा दाखल झालेला नाही. तुम्ही कसा त्यांच्यावर आरोप करता, अशी विचारणा केली. यावेळी मल्ल पाटील आणि सीमा पाटील, गीता हसूरकर यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती शांत केली. त्यानंतर स्पर्धा सुरळीत सुरू राहिल्या.यावर पत्रकारांशी बोलताना सीमा पाटील म्हणाल्या, गंभीर असे लैंगिक आरोप असणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांना कुस्ती स्पर्धेतील बक्षीस वितरण करण्यासाठी आणणे चुकीचे आहे. सत्ताधारी पक्षाचे ते खासदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. अशा खासदारांकडून महिला मल्लांनी ऐतिहासिक अशा खासबाग मैदानात बक्षीस स्वीकारू नये. त्यांचा आम्ही गुरुवारीही विरोध करणार आहोत. त्यांच्या विरोधात निदर्शने करणार आहोत.
कोल्हापुरातील महिला कुस्ती स्पर्धेत राडा, लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या खासदार ब्रिजभूषण यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 5:36 PM