राम मगदूम - गडहिंग्लज -चंदगड मतदारसंघ आघाडीतील राष्ट्रवादीच्या वाट्याला असून, महायुतीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या ठिकाणी दावा केला आहे. ‘राष्ट्रवादी’तर्फे विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांची, तर ‘स्वाभिमानी’तर्फे राजेंद्र गड्यान्नावर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र, आघाडीतील काँगे्रसतर्फे माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, संभाजीराव देसाई-शिरोलीकर व विद्याधर गुरबे यांनीही तयारी केली असून, ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारीवर संग्राम कुपेकर यांनी, तर ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारीवर नितीन पाटील यांनी आपला हक्क सांगत जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांसमोर बंडखोरीचे आव्हान असून, राष्ट्रवादीत ‘तणाव’, तर स्वाभिमानीमध्ये ‘संभ्रम’ आहे.स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीपासूनच त्यांचे पुतणे संग्राम कुपेकर यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. दरम्यानच्या काळात स्व. कुपेकरांची कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनीच निवडणूक लढवावी, असाही मतप्रवाह होता. मात्र, उमेदवारीला कधीही दुजारो दिलेला नसतानाही या निवडणुकीत मायलेकी दोघींनी उमेदवारीसाठी ‘मुलाखत’ देऊन पक्षाने जबाबदारी दिल्यास ‘पेलण्याची’ तयारी दाखविली. त्यामुळे संग्रामसमोर बंडखोरीशिवाय पर्याय नाही.दीड वर्षापूर्वीच झालेल्या पोटनिवडणुकीत संध्यादेवींच्या विरोधात काट्याची टक्कर दिलेल्या गड्यान्नावर यांचाही आत्मविश्वास दुणावला असून, तेही जिंकण्याच्या इराद्यानेच कामाला लागले. गतवेळच्या निवडणुकीत ‘गडहिंग्लज’च्या तुलनेत ‘चंदगड’मधून गड्यान्नावर यांना मिळालेल्या मताधिक्यांमुळे नितीन पाटीलही उमेदवारीसाठी आक्रमक झाले आहेत. मात्र, संघटना बांधणी व खासदार शेट्टी यांच्याशी निकटचे संबंध लक्षात घेता गड्यान्नावर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळेच नितीन पाटील यांना बंडखोरीशिवाय पर्याय नाही.निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या ‘जनसुराज्य शक्ती’ तर्फे अॅड. श्रीपतराव शिंदे यांची कन्या प्रा. स्वाती कोरी व संग्राम कुपेकर यांची नावे चर्चेत आहेत. त्यांनी कोरे यांची भेट घेतल्याने रंगत येणार आहे.
राष्ट्रवादीत ‘तणाव’, स्वाभिमानीत ‘संभ्रम’
By admin | Published: September 18, 2014 12:17 AM