एकनाथ पाटीलकोल्हापूर : दहावीचा अभ्यास होत नव्हता; नापास होण्याची भीती मनात होती; त्यामुळे आम्ही दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. कामधंदा करून पोट भरायचे, असे ठरवून आम्ही पळून गेलो. पुणे रेल्वे स्टेशनसमोरील हॉटेलमध्ये सात दिवस वेटरचे काम केले, त्याच ठिकाणी राहिलो, अशी कबुली सांगरूळ (ता. करवीर) येथील बेपत्ता दोघा शाळकरी मुलांनी पोलिसांना दिली.
हृषिकेश कृष्णात नाळे व श्रेयस विजय पोवार खिशामध्ये एक रुपयाही नसताना दोघेजण १४ नोव्हेंबरला घराबाहेर पडले. सांगरूळमधून दुचाकीस्वारांकडे लिफ्ट मागून ते कोल्हापुरात आले. रंकाळा स्टॅँडवरून चालत रेल्वे स्टेशनवर आले. तेथून रात्री रेल्वेने ते पुण्यामध्ये आले. १५ नोव्हेंबरला पहाटे पुण्यामध्ये आल्यानंतर दोघेही भांबावून गेले. तो दिवस रेल्वे स्टेशनवरच उपाशीपोटी झोपून काढला. त्याच रात्री त्यांच्याजवळ असलेला मोबाईल चोरीला गेला. त्यामुळे दोघेही हतबल झाले. १६ नोव्हेंबरला सकाळी पोटाची भूक आवरेना म्हटल्यावर त्यांनी रेल्वे स्टेशनसमोर असलेले हॉटेल गाठले. येथील मालकाला ‘आम्हाला काम हवे आहे, कोल्हापूरहून आलो आहे,’ असे सांगून हृषिकेश नाळे याने आपले आधार कार्ड दाखविले; तर श्रेयस पोवार याने आपण अनाथ असल्याचे सांगितले. दोघांची अवस्था पाहून त्या हॉटेलमालकाने त्यांना वेटर म्हणून ठेवून घेतले.
दिवसभर काम करून ते हॉटेलमध्येच राहत होते. मालकाने किरकोळ खर्चासाठी ५०० रुपये दिले. त्याची त्यांनी बनियन आणि हाफ पॅँट खरेदी केली. जवळ पैसे नसल्याने ते पुढे कोठेच जाऊ शकत नव्हते. चार-पाच दिवस-रात्र मेहनत करून दोघेही थकले. हॉटेलमध्ये उत्तर प्रदेशमधील एक कामगार होता. त्याच्याशी मैत्री झाली. हृषिकेशला घरची ओढ लागू लागल्याने त्याने उत्तरप्रदेशच्या मित्राच्या मोबाईलवरून घरी नातेवाइकाच्या मोबाईलवर फोन करून पुण्यात असल्याचे सांगितले.
या दोघा शाळकरी मुलांची वर्दी करवीर पोलीस ठाण्यात दाखल होती. पोलीस त्यांचा शोध घेत होते. नातेवाइकाच्या मोबाईलवर आलेल्या फोनवरून पोलिसांनी पुण्यातील लोकेशन शोधून काढले. उजळाईवाडी महामार्ग पोलीस शाखेचे हवालदार तौसीफ मुल्ला, रामदास गायकवाड, राहुल देसाई, बबन शिंदे, शहाजी पाटील, भरत कांबळे हे लोणावळा महामार्गावर १५ दिवस बंदोबस्ताला होते. त्यांच्याशी या मुलांचा शोध घेण्यासाठी संपर्क साधला होता. तौसीफ मुल्ला यांनी मोबाईल लोकेशन मिळवून थेट हॉटेल गाठले. याबाबत पूर्णत: गोपनीयता पाळली होती. मुलांना थोडीजरी चाहूल लागली तर तेथून ती पळून जातील, या भीतीपोटी त्या उत्तरप्रदेशच्या कामगाराच्या मोबाईलवर संपर्क साधला नव्हता.
हॉटेलमध्ये गेल्यानंतर हृषिकेश व श्रेयस वेटरचे काम करताना दिसून आले. मुल्ला यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता दोघेही बिथरून गेले. त्यांना धीर देत हॉटेलमालकाला वस्तुस्थिती सांगून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुल्ला यांनी स्वखर्चाने त्यांना पुण्याहून कोल्हापूरला आणले. करवीर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर दोघांच्याही पालकांना बोलावून घेतले. याठिकाणी जबाब घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. आठ दिवस गायब झालेल्या मुलांना पाहून पालकांचे डोळे भरून आले. त्यांनी हवालदार तौसीफ मुल्ला यांचे आभार मानले. मुलांनीही आम्ही चुकलो, म्हणून वडिलांना मिठी मारली.
पंधरा दिवसांची ओळख.....श्रेयस पोवार हा दहावी नापास होता. त्याने पुन्हा फॉर्म भरला होता; परंतु अभ्यास होत नव्हता. तो सांगरूळ येथील मामाकडे १५ दिवसांपूर्वी राहण्यासाठी आला होता. याचवेळी त्याची हृषिकेशची ओळख झाली. तो दहावीमध्ये असल्याने दोघांनाही नापास होण्याची भीती होती. परीक्षेनंतर घरचे ओरडतील, त्यापूर्वीच पळून गेलेले बरे, असे ठरवून दोघेही अंगावरील कपड्यांवर घराबाहेर पडले होते. आपली चूक त्यांच्या लक्षात आली होती. दोघेही करवीर पोलीस ठाण्यात बिथरूनच होते. पालक मात्र त्यांना धीर देत होते.