कोल्हापूर: एसएससी बोर्डाची (राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) वेबसाईटच क्रॅश झाल्याने दहावीचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन लागला पण दुपारपर्यंतही तो पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा जीव टांगणीला लागला.
घराघरात प्रत्येक जण मोबाइलवर वेबसाईट सुरू होण्याची प्रतीक्षा पाहत असल्याचे चित्र होते. कॅफेमध्येदेखील विद्यार्थ्यांनी गर्दी केली, पण तेथेही पदरी निराशाच आली. त्यामुळे पास झालो पण मार्क नाही कळले अशीच परिस्थिती सर्वांची होती.दहावीचा निकाल गेल्या चार-पाच वर्षांपासून ऑनलाइनच लागत असल्याने निकालाविषयी प्रचंड हुरहूर असते. पण यावर्षी कोरोनामुळे परीक्षाच न झाल्याने जेवढ्यांनी म्हणून नोंदणी केली ते सर्व विद्यार्थी दहावी पास होणार असल्याने पास-नापासची उत्सुकताच नव्हती. होती ती फक्त किती मार्क मिळाले याचीच.
त्यामुळे दुपारी १ वाजता मार्क पाहायला मिळणार म्हणून १२ वाजल्यापासून मोबाइलवर निकालाची लिंक सर्च करण्यात सर्वच जण व्यस्त होते. प्रत्यक्षात १ वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाकडून दिलेल्या वेबसाईटपैकी एकही लिंक खुली होत नव्हती. प्रत्येक जण एकमेकांकडे विचारपूस करत होता, पण दुपारचे चार वाजून गेले तरी देखील लिंक खुली झाली नाही.सर्वच जण पास झाल्याचा जल्लोष सुरू असताना किती मार्क मिळाले असतील याची हुरहूर प्रत्येक विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. दहावीचे हे मार्क पुढील प्रवेशासाठी किती गृहीत धरणार हे पुढील शासन धोरणावर अवलंबून असले तरी किमान सीईटीसाठी पात्र ठरतील या अपेक्षेनेच निकालाची उत्सुकता होती.बैठक क्रमांक शोधण्याची सोयबैठक क्रमांक विसरला असल्यास तो कळावा यासाठी बोर्डाने यावर्षी वेबसाईटवर विशेष सेवा दिली होती. त्यात संबंधित विद्यार्थ्याची जन्मतारीख, आईचे नाव याचा कॉलम भरल्यानंतर बैठक क्रमांक उपलब्ध करून दिला जात होता. नंतर हा बैठक क्रमांक घेऊन मगच वेबसाईटवर टाकून निकाल पाहता येणार होता, पण प्रत्यक्षात एकही लिंक ओपन होत नसल्याने निकाल पाहता आला नाही.