कोल्हापूर : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूर विभागाचा दहावीचा निकाल ३०.१७ टक्के, तर बारावीचा निकाल १४.८० टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १५ टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, बारावीचा निकाल ५.२४ टक्क्यांनी घटला आहे. यावर्षी दोन्ही परीक्षेत विभागातील एकूण १५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभाग राज्यात सातव्या, तर बारावीच्या परीक्षेत आठव्या क्रमांकावर आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षांचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय सचिव डी. बी. कुलाळ यांनी दिली. यावेळी सुवर्णा सावंत, एस. वाय. दुधगांवकर, आदी उपस्थित होते.
यावर्षी कोल्हापूर विभागातून दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २७७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २६५५ जणांनी परीक्षा दिली. त्यातील ८०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३०.१७ इतकी आहे. या परीक्षेत मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलींपेक्षा ३.७४ टक्के अधिक आहे. बारावीच्या परीक्षेसाठी ५३६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५३५९ जणांनी परीक्षा दिली. त्यातील ७९३ जण उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी १४.८० आहे.
बारावीत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १२.५७ टक्क्यांनी अधिक आहे. दहावीच्या परीक्षेत एकही गैरमार्ग प्रकरण (कॉपीकेस) घडले नाही. बारावीमध्ये तीन प्रकरणे सापडली. त्यात कोल्हापूरमधील दोन, तर सांगलीतील एक आहे. त्यांच्यावर शिक्षण मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत २ जानेवारी २०२१ पर्यंत आहे.