लोकमत न्यूज नेटवर्क
पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे ग्रामपंचायतीची निवडणूक गटाच्या अस्तित्वापेक्षा गटनेत्यांच्या कसोटीची ठरणार आहे. गेल्या अनेक पराभवातून धडा घेत विरोधकांनी वीस वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी तीन गटांची मोट बांधली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक दुरंगी, चुरशीची होणार आहे.
गावात उदय आणि कासारी हे परस्परविरोधी गट असले तरी या गटातून फारकत घेतलेल्या गटाने मागील निवडणुकीत पॅनेल केल्याने तिरंगी लढतीत कासारी गटाने सलग चारवेळा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले. सोयीच्या राजकारणात जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून दोन्ही इतर निवडणुकांत एकत्र आले असले तरी, मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी उदय गटाने फुटीरवादी गटाशी हातमिळवणी करत कासारी गटाला तगडे आव्हान निर्माण केले आहे. गटातील एकाधिकारशाही आणि कार्यकर्त्यांची घुसमट यामुळे निवडणुकीत उमेदवार निवडताना गटनेत्यांची दमछाक होत आहे. यावेळच्या निवडणुकीत वेगळाच रंग असल्याने विजयाचा अंदाज लागत नसल्याने बऱ्याच कार्यकर्त्यांनी उमेदवारीला रामराम केला आहे.
निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तरी काही वाॅर्डात अधिकृत उमेदवारी शोधमोहीम सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी राजकीय सारीपटावर नामुष्की अनुभवायला मिळत आहे. विरोधकाचा शत्रू तो आपला मित्र, या भावनेतून जनसुराज्य पक्षाचा उदय गट, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तीन गट मिळून कासारी गटाविरोधात मोर्चेबांधणी केली आहे. कासारीच्या सत्तेला शह देण्यासाठी विरोधकांनी युतीची चाल खेळली असली तरी, काही कार्यकर्त्यांच्या मनातील पराभवाचे शल्य त्यांची अस्वस्थता दर्शवत आहे. त्यामुळे एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या नादात काही भलतंच होणार नाही ना, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाही तर कासारी गटाने याचाच फायदा घेत अनेक निवडणुकांत गुलाल उधळला आहे.
चौकट
बिनविरोधची वांझोटी चर्चा!
ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठीची चर्चा आकडेवारीपेक्षा अहंकाराच्या मुद्द्यांवर निष्फळ ठरली. एकाच पक्षाच्या झेंड्याखाली काम करणारे यावेळी परस्परविरोधी लढू नयेत म्हणून पक्षश्रेष्ठींसह काही नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु ती चर्चा निष्फळ ठरली. निवडणूक बिनविरोध झाली, तर हे दोन्ही गट आज-उद्या एकत्र येतील आणि फुटीरवादी गटाला तसेच बसावे लागेल. हा संशयाचा मुद्दाही बिनविरोधसाठी घातक ठरला असल्याची चर्चा रंगत आहे.
प्रभाग-०६
सदस्य संख्या - १७
मतदान संख्या - ५८५८